

rat1p3.jpg-
34639
डॉ. शरद प्रभूदेसाई
परिवर्तन---------लोगो
इंट्रो
सुट्टीत आजोळी जाई. तेथे गीतेचे पुस्तक होते. त्यातून पाहून म्हणे. एक-दोन वेळा हा गीता म्हणत असताना मामाने ऐकली. याचे पठण पूर्णतः अशुद्ध होते, असे मामाचे मत पडले. त्यासाठी श्रीची मामाने कानउघाडणी केली, तसेच ती अशुद्ध म्हणू नये असा दमही भरला. गीता अशुद्ध म्हटल्यास ईश्वराचा कोप होऊ शकतो, असा श्रीचा समज झाला. त्याने मामालाच गीता शुद्ध म्हणायला शिकवायला गळ घातली. आजोळी असेपर्यंत मामा शिकवत असे; पण घरी गेल्यावर पुस्तक नसल्याने पाठांतर होत नसे. मग हा येईल तशी म्हणे. गीता हे देवाचे स्तोत्र होते, ते म्हटल्याने ईश्वरभक्तीत भर पडणार होती. त्यामुळे आपल्याला येईल तसे तो म्हणे. मामाने अध्याय पाठ झाले म्हणून याला शाबासकी दिली. गीतेतील काही अध्याय आपल्याला पाठ येतात याची जाणीव झाली, त्यामुळे तो मनस्वी सुखावला.
- डॉ. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी
--------
खराखुरा गणपती भक्त झाल्याचा श्रीला आनंद
मुंबईला काकांकडे मुलांनी सायंकाळी परवचा म्हटलीच पाहिजे, देवाला नमस्कार केलाच पाहिजे, ‘शुभं करोती’ म्हटलीच पाहिजे, असे नियम नव्हते. तरीही श्री सायंकाळी देवाला मनोभावे नमस्कार करून ‘शुभं करोती’ म्हणे. गावचा परिपाठ त्याने इथेही चालू ठेवला होता. मग तो अभ्यासासाठी बसे. मुंबईत आल्यापासून हा नियम त्याने कायम चालू ठेवला होता. घरातील कोणीही मोठी माणसे यासाठी आग्रही नव्हती, यासाठी त्याचे सर्वजण कौतुक करीत. काही बाबतीत त्याच्यावर काकू वैतागत असे, पण सायंकाळच्या त्याच्या नियमाबाबत ती कौतुकाने सर्वांना सांगे. ती तिच्या मुलांनाही श्रीचा आदर्श समोर ठेवून त्याच्याप्रमाणे वागायला सांगे. काकूने दिलेल्या शाबासकीमुळे तो या नियमांचे अधिक जोमाने पालन करत असे.
जेवण झाल्यावर तो गॅलरीत शतपावली करी. फेऱ्या मारता मारता ठराविक स्तोत्रांचे पठण करी. त्यात रामरक्षेचा अंतर्भाव असे. रामरक्षा म्हटल्याशिवाय तो कधीच झोपत नसे. रामरक्षा म्हटली की तो एक प्रकारची सुरक्षितता अनुभवत असे. रामदासांची करुणाष्टकेही तो म्हणे. या सर्व पठणाला साधारणतः पंधरा मिनिटे लागत. पुढे मोठेपणीही त्याचा हा नियम चालू होता. या सर्वांमुळे देवभक्त आणि भावूक असलेल्या काकूची त्याच्यावर विशेष मर्जी होती.
काकांना रात्री भगवद्गीतेतील श्लोक म्हणण्याची सवय होती. दररोज एकतरी अध्याय म्हणत. बरेचदा बारावा किंवा पंधरावा अध्याय म्हणत. काका गीता म्हणतात इतकेच माहित होते. त्याच वेळी तो अभ्यास करीत असे. त्याच्या कानावरून हे काकांचे गीतापठण जाई. हे दोन्ही अध्याय लहान आणि ऐकायला गोड. काका अध्याय म्हणताना श्री ते लक्षपूर्वक ऐकायचा. ऐकायला गोड होतेच, पण श्रीला ते म्हणायलाही सोपे वाटले. साधारणतः आठवड्यातून तीन-चार वेळा अध्याय त्याला ऐकायला मिळत. ऐकता ऐकता त्याचे श्लोक हळूहळू पाठ होऊ लागले. आठवीपासून त्याला संस्कृत विषय होता. मग त्याने गीतेच्या पुस्तकात बघून पाठांतर सुरू केले. काही महिन्यांतच त्याचे दोन्ही अध्याय पाठ झाले. मे महिन्यात सुट्टीला गावी जाई तेव्हा तिकडे पुस्तक नसल्याने त्याची पंचाईत होई.
श्री सुट्टीत गावी आला की हमखास आजोळी जायचा. आजोळी सर्व देवभक्त होते. सर्व मामेभावंडे सायंकाळी परवचा म्हणत. श्रीही आनंदाने त्यांच्याबरोबर बसे. मामेभावंडांचे स्तोत्र पाठांतर पाहता श्रीचे पाठांतर सुमार होते, याची श्रीला जाणीव होतीच. ती सर्वजण स्तोत्रे म्हणत असताना हा त्यांच्याकडे पाहत बसे. त्याबाबत तो नाराज होता. तसा श्री सर्व देवांचा भक्त होता, पण त्याची जास्त भक्ती गणपतीवर होती. गणपतीची स्तुती असलेले ‘अथर्वशीर्ष’ आजोळी म्हणत. सर्व मामांना ते पाठ होतेच, पण श्रीहून लहान असलेले मामेभाऊही ते म्हणत. त्यांचेही ते पाठ होते. त्यामुळे तो अधिक नाराज झाला. तसा तो त्या मामेभावांपेक्षा बराच मोठा! साहजिकच आपणही ते पाठ करावे असे त्याला वाटले; पण ते शिकवणार कोण, हा प्रश्न त्याला पडला. श्री आजोळी जात असला तरी थोडेच दिवस राहायचा. या थोड्याच दिवसांत ते पाठ होणे कठीण होते.
श्री नववीत होता. त्यावेळी तो दिवाळीच्या सुटीमध्ये गावाला आला होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो आजोळी गेला. मामाला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले. घरात इतर कोणीच नव्हते, त्यामुळे तेथील देवाची पूजा श्रीला मामा परत येईपर्यंत करावी लागणार होती. म्हणजे श्रीचा आजोळचा मुक्काम वाढणार होता. त्यावेळी छोटा मामेभाऊ तेथे होता. त्याचे अथर्वशीर्ष पाठ होते. त्याच्याकडून ते शिकायचे असे त्याने ठरविले. रोज सकाळ-संध्याकाळ श्री मामेभावाकडून शिकू लागला. तो भाऊ लहान असल्याने पाठ करून घेण्यास टंगळमंगळ करत असे; पण श्री त्याच्या पाठीस लागून त्याला शिकवायला भाग पाडत असे. दहा-बारा दिवसांत त्याचे अथर्वशीर्ष पाठ झाले. तो फारच आनंदी झाला. दररोज आंघोळीनंतर तो अथर्वशीर्ष म्हणू लागला. अशी ही अथर्वशीर्ष पाठ करण्याची कथा तो आईला तिखटमीठ लावून सांगे. आई त्याचे सर्वांजवळ कौतुक करी. उन्हाळी सुटीत संकष्टीला तो घरच्या गणपतीची चक्क एकादशणी करू लागला. त्यामुळे घरातील सर्व भाविक मंडळी त्याचे तोंडभरून कौतुक करू लागली. आपण आता खराखुरा गणपती भक्त झाल्याचा त्याला आनंद झाला. या लहान मामेभावाने त्याला अथर्वशीर्ष शिकविले, याचे श्रीला फारच कौतुक होते. त्यातच काकांच्या कोणत्याही मुलाचे अथर्वशीर्ष पाठ नव्हते, त्यामुळे त्याला अधिकच अभिमान वाटत असे.
(लेखक बालरोगतज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.