

34730
लांजा तालुक्यात विजेचा खेळखंडोबा
वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण ; महावितरणच्या कारभारावर संताप
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १ ः वातावरणातील तापमानाचा पारा चढला असतानाच गेल्या काही दिवसांपासून लांजा शहरासह तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सततच्या ''बत्ती गुल''मुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले असून, याचा मोठा फटका शासकीय कामांना आणि नळपाणी योजनांना बसत आहे. वीज बिल भरले नाही तर तातडीने कारवाईचा बडगा उगारणारे महावितरण, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यतत्परता दाखवणार का? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मार्च महिन्यातील उष्म्यामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्यात भर टाकली आहे. दिवसाबरोबरच रात्री-अपरात्री कधीही वीज जात असल्याने लोकांची झोपही उडाली आहे. याचा सर्वाधिक फटका छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. दुग्धजन्य पदार्थ, शीतपेये आणि गोठवलेले खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांचे फ्रीज बंद राहत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच बँका, दवाखाने आणि सेतू केंद्रांमधील सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.
शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ''लो व्होल्टेज''चा (कमी दाबाचा पुरवठा) प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटर आणि पंखे यांसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून जात आहेत. एकीकडे वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त असताना महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दरम्यान, मार्च एंडिंग चे कारण पुढे करत महावितरणकडून वीजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, तेवढ्याच तत्परतेने सुरळीत वीजपुरवठा का दिला जात नाही? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. असह्य उन्हात मेटाकुटीस आलेल्या जनतेच्या प्रश्नांकडे महावितरणचे अधिकारी गांभीर्याने पाहणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
नळपाणी योजनेवर परिणाम
सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे लांजा नगरपंचायत आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजना विस्कळीत झाल्या आहेत. मोटारी चालू न शकल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळी बेगमीसाठी लागणाऱ्या पिठाच्या गिरण्या, मसाला गिरण्या आणि लॉन्ड्री व्यावसायिकांचेही काम ठप्प झाले आहे.
कोट
शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजबिल वेळेवर भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नसल्याचेच यातून दिसून येत आहे. याचा जाब विचारण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
- मोहन तोडकरी, शहर प्रमुख, ठाकरे शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.