

34715
विकासाची परिभाषा ठरविण्याची हीच वेळ
नितीन वाळके ः आजगावात मालवणी भाषा साहित्य सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि बोलीभाषा सातत्याने वापरात राहिली तरच ती तो टिकून राहते. स्वार्थी वृत्तीमुळे आपण आज विनाशाकडे चाललो आहोत. विकासाची परिभाषा कोणती याचा विचार करण्याची गरज आहे. श्रमजीवी स्थिती स्वीकारली नाही, तर पुढील जीवन कठीण आणि कष्टमय होईल. अशावेळी अशा प्रकारचे साहित्यिक कार्यक्रम फार महत्त्वाचे व सुखी जीवनाला मार्गदर्शक ठरू शकतात, असे प्रतिपादन मालवण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्य क्षेत्राशी निगडित तथा जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी केले.
मालवणी बोली भाषेच्या सन्मानार्थ आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याने आखलेल्या आणि आरवली गावातील हॉटेल माहेर सभागृहात मंगळवारी (ता. ३१) झालेल्या मालवणी भाषा साहित्य सोहळा या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मालवण येथील प्रख्यात मालवणी कवी रुजारिओ पिंटो हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचा हा सलग मासिक ६५ वा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची सुरुवात रवींद्र पणशीकर यांच्या मालवणी कीर्तनाने झाली. ''हेची दान देगा देवा'' या तुकोबारायांच्या अभंगावरच्या मालवणी रुपांतरणावर त्यानी निरुपण केले. त्यांना संवादिनीची साथ चिन्मय प्रभुराळकर यांनी केली, तर तबला साथ प्रसाद जोशी यांनी केली. अभंगाचे रुपांतर विनय सौदागर यानी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंटो व अतिथी वाळके यांचे स्वागत दिलीप पांढरे यांचे हस्ते वालीच्या पेंड्या, खडखडे लाडू आणि पुस्तक देऊन करण्यात आले. वैविध्यपूर्ण आखलेल्या या कार्यक्रमात ''देवाक काळजी'' या स्नेहा राणेंच्या पुस्तकाचे परीक्षण सरोज रेडकर यानी केले; तर ‘गजालीतली माणसे’ या प्रकाश सरवणकरांच्या पुस्तकाचे परीक्षण विशाखा वेंगुर्लेकर यांनी केले.
काही कवितांचे रुपांतरण सादर करण्यात आले. ‘कुणाच्या खांद्यावर’ या आरती प्रभूंच्या कवितेचे रुपांतर सोमा गावडे यांनी, तर ‘आयुष्याचं पान’ या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचे रुपांतर स्नेहा नारिंगणेकर यांनी सादर केले. बाळकृष्ण राणे यांनी ‘काळ्या रातीचा पिवळा सपान’ ही मालवणी भयकथा सुरेख सादर केली. राजेश वैज यानी गुरु ठाकुरांची कविता व विनय सौदागर यांनी प्रसाद जोशींची कविता सादर केली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कमलेश अणावकर लिखित ‘देवपणातला शाणपाण’ ही श्रुतिका. कमलेश, श्रद्धा राऊळ, व्यंकटेश पारकर आणि गौरेश गोसावी या युवा कलाकारांच्या सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद लाभला. याच कलाकारांनी (कै.) मयूर खानोलकर याना श्रद्धांजली म्हणून मालवणी कवींची डबलबारी सादर केली.
शेवटच्या सत्रात दीपक पटेकर यांनी ‘अवसार’, अतुल माईणकर यांनी ‘गो बाय’, राजेंद्र गोसावी यांनी ‘गॅस टंचाई’ अशा कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुजारिओ पिंटो यांनी लोकशाय, आय, पाथर, कायच कळणां नाय अशा कविता सादर करीत रसिकांची दाद मिळवली. तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.