''पतंजली''तर्फे रविवारपासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण

''पतंजली''तर्फे रविवारपासून 
सहयोग शिक्षक प्रशिक्षण
Published on

‘पतंजली’तर्फे रविवारपासून
सहयोग शिक्षक प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः पतंजली योग समिती, सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर ५ ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षण शिबिराचा लाभ इच्छुकांना ‘ऑनलाइन’ किंवा ‘ऑफलाइन’ अशा दोन्ही पद्धतीने घेता येईल. प्रशिक्षणाची वेळ सकाळी ५.३० ते ७.३० अशी असून, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘ऑनलाइन’ थेअरी विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. २५ दिवसांच्या या विशेष अभ्यासक्रमात १०० तासांचे प्रशिक्षण देऊन सहभागींना परिपूर्ण योगशिक्षक बनवले जाणार आहे.
​प्रशिक्षणादरम्यान रोगानुसार योगासने, योगाभ्यास, योगाचे मूलभूत सिद्धांत, गीतादर्शन, घरगुती उपचार, सूर्यनमस्कार, अष्टांग योग, प्राणायाम, अष्टचक्र आणि ॲक्युप्रेशर यांसारख्या विविध विषयांचे सखोल ज्ञान दिले जाईल. यासोबतच ‘पतंजली’चा परिचय, उपनिषदे आणि आहार-विहारातील योगाचे महत्त्व यावरही प्रकाश टाकला जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पतंजली योग समितीचे अधिकृत ‘सहयोग शिक्षक’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रामुळे भविष्यात योग प्रशिक्षक म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शिबिरासाठी मर्यादित जागा शिल्लक असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी किंवा वैश्यवाडा (सावंतवाडी) येथील पतंजली योग वर्गाशी संपर्क साधावा.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com