

वाफोली धरणात शून्य पाणीसाठा
‘गेट वेल’ला गळती; सततच्या सुरुंग स्फोटांचाही परिणाम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ : वाफोली येथील लघु पाटबंधारे धरणात सध्या शून्य पाणीसाठा असल्याची गंभीर बाब येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सावळ यांनी निदर्शनास आणून दिली. विशेष म्हणजे, दरवर्षी मेपर्यंत या धरणात पाणी उपलब्ध असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ‘गेट वेल’ला लागलेली गळती, तसेच क्वारीत होणाऱ्या सततच्या सुरुंग स्फोटांमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षी गेट वेलची दुरुस्ती करण्यात आली होती. तथापि, ही दुरुस्ती अपुरी व निकृष्ट दर्जाची ठरल्याने गळती अद्याप सुरू असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, मातीच्या धरणाला सहसा गळती होत नाही. मात्र, काळ्या दगडातील गेटला सिमेंटद्वारे योग्य पद्धतीने दुरुस्त करून त्याला पुरेसा वेळ दिला गेला नाही, ही मोठी तांत्रिक त्रुटी ठरली आहे.याशिवाय, धरणालगत सुरू असलेल्या खाण (क्वारी) परिसरातील सततच्या सुरुंग स्फोटांमुळे दुरुस्तीवर विपरीत परिणाम झाला असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, उच्च क्षमतेच्या स्फोटांमुळे धरणाच्या तळातील झऱ्यांची दिशा बदलून ते पाणी क्वारीच्या खड्ड्यात वळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ही खाण धरणापेक्षा अधिक खोल झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
सुदैवाने, तिलारी कालव्यामुळे गावाला काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे. अन्यथा वाफोली गाव पूर्णतः ओसाड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीची माहिती लघुपाटबंधारे विभागाला देण्यात आली असूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. वाफोली गावाचे हक्काचे धरण असूनही काही धनदांडग्यांच्या फायद्यासाठी गावाचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने योग्य दुरुस्ती, खाणकामावर नियंत्रण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी श्री. सावळ यांनी केली आहे.
-------
जलजन्य रोगांचा धोका वाढला
दरम्यान, मुख्य नळयोजनेच्या विहिरीजवळ खड्डा खोदून त्यात पाणी साठवले जात आहे. मात्र हे पाणी पूर्णतः हिरवे झाले असून त्यातून जलजन्य रोगांचा धोका वाढला आहे. याच दूषित पाण्याचा वापर खालच्या उपयोजनांमध्येही होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.