

35283
ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख
दुर्मीळ बाब; तारीख, नाममुद्रा असलेली १४२ वर्षांपूर्वीची रचना
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ : ‘‘शिलालेख हे इतिहासाच्या अभ्यासाचे एक मुख्य साधन आहे. मात्र, देवतेच्या मूर्तीवर सहसा शिलालेख आढळत नाही. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस बुद्रुक येथील सातेरी मंदिर परिसरातील क्षेत्रपाल मंदिरात असलेल्या महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीवर तारीख आणि नाममुद्रा असलेला १४२ वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. ही बाब अतिशय दुर्मीळ आहे,’’ अशी माहिती पुरातत्त्व आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.
श्री. लळीत म्हणाले, ‘‘ओरोस बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळा क्र. १ च्या जवळ सातेरी देवीचे मंदिर आहे. जवळच अन्य दोन छोटी मंदिरे आहेत. पैकी श्री देव क्षेत्रपाल या मंदिरात क्षेत्रपाल व वंशदेवतांच्या जोडीनेच महिषासुरमर्दिनीची सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती आहे. या मूर्तीवर देवीच्या मागच्या डाव्या हातामागे स्पष्ट कोरलेला एक शिलालेख आढळून आला आहे. ‘ता. २९ मे स. १८८४ रामजी कुमया च्यारी’ असा हा लेख आहे. यात २९ मे १८८४ हा काळाचा स्पष्ट उल्लेख इंग्रजी सनानुसार असून ‘रामजी कुमया च्यारी’ हे व्यक्तिनाम कोरलेले आहे. कदाचित या तारखेला या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असावी व रामजी कुमया च्यारी नावाच्या दानशूर भाविक व्यक्तीने ही मूर्ती दान केली असावी, असा अर्थ यातून निघू शकतो. मूर्ती मंदिरात असल्याने ती आणि शिलालेख अत्यंत सुरक्षित असून कोणतीही झीज झालेली नाही, असे दिसून येते.’’
ते म्हणाले, ‘‘क्षेत्रपाल ही ग्रामीण भागात सर्रास आढळणारी देवता आहे. ही देवता जमीन, शेत किंवा विशिष्ट भौगोलिक प्रदेशाची रक्षक देवता मानली जाते. गावाच्या किंवा जमिनीच्या सीमांचे दुष्ट शक्तींपासून संरक्षण करणे, हे त्यांचे कार्य आहे. सामान्यतः हे शिवाचे स्वरूप (भैरव) मानले जाते. शेतजमीन किंवा वास्तूच्या रक्षणार्थ क्षेत्रपाल देवतेला पूजले जाते. ‘क्षेत्र’ (जमीन/जागा) अधिक ‘पाल’ (रक्षक) म्हणजे ‘जमिनीचे रक्षण करणारा’ असा त्याचा अर्थ आहे. क्षेत्रपाल अनेकदा भैरव, म्हसोबा किंवा स्थानिक ग्रामदेवतेच्या रुपातही आढळतो. शेती पेरणीपूर्वी, गृहप्रवेशावेळी किंवा नवीन जमीन घेताना क्षेत्रपालाची पूजा करण्याची प्रथा आहे. क्षेत्रपाल हे ग्रामदेवता आणि कुलदेवता यांच्याशी संबंधित असून, त्यांना जमिनीचे रक्षक दैवत मानले जाते. अशा या क्षेत्रपाल मंदिरात महिषासुरमर्दिनीची ही मूर्ती स्थापित केली आहे, हे विशेष.’’
----------
...अशी आहे आख्यायिका
मूर्तीबाबत लळीत म्हणाले, ‘‘संपूर्ण भारतात देवी किंवा शक्तिपूजा केली जाते. याबाबतची कथा अशी आहे की, आदिशक्तीने निरनिराळी रुपे घेऊन चंड, मुंड, शुंभ, निशुंभ आदी राक्षसांचा संहार केला. त्यात महिषासुराचा संहार करणारी जी देवी, तिला दुर्गा असे म्हणतात. रंभ नावाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा म्हणजे महिषासुर होय. याने ब्रह्मदेवाची आराधना करून अमरत्व मागितले; पण यात एवढी सूट मिळाली की, त्याचे मरण स्त्रीशिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. त्याने अन्याय सुरू केले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व शंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आपापल्या संमिलित तेजाने एक स्त्री उत्पन्न केली. हीच ‘महाशक्ती’ होय. हिचे निरनिराळ्या रुपांत वर्णन मिळते. हिनेच पुढे महिषासुराचा वध केला व दैवी संपत्ती आणि समृद्धीची पुनर्स्थापना केली. तिचे वाहन सिंह असून तो तिला हिमालयाकडून मिळाला आणि निरनिराळी आयुधे ही वेगवेगळ्या देवांकडून मिळाली, अशी धारणा आहे. भारतात साधारणपणे महिषासुरमर्दिनी दुर्गेची आराधना केली जाते.’’
-------
मूर्तीची रचना
क्षेत्रपाल मंदिरातील महिषासुरमर्दिनी दुर्गेची मूर्ती स्थानक प्रकारची (उभी) आणि चतुर्भुज आहे. मूर्तीच्या मागे नक्षीयुक्त प्रभावळ असून मध्यभागी वर कीर्तिमुख कोरले आहे. करंडक मुकुटाने आणि माफक दागिन्यांनी ती सुशोभित आहे. किरीटकुंडले अतिशय देखणी आहेत. चारही हातांत कंकणे आहेत. गळ्यात पुतळ्यांची माळ ठळकपणे दिसत आहे. उजव्या मागील हातामध्ये तलवार असून डाव्या मागील हातामध्ये ढाल आहे. पुढील उजव्या हातात खांडा असून तिने तो महिषाच्या शरीरात खुपसला आहे. पुढील डाव्या हाताने महिषाची जीभ पकडली आहे. डाव्या पायाने तिने महिषाला दाबून धरले आहे. मूर्तीच्या अगदी खाली फुले आणि वेलींची नक्षी पाहायला मिळते. ही मूर्ती सिंहविरहित आहे. देवीच्या वस्त्राची किनार नक्षीने अंकित करण्यासाठी मूर्तिकाराने खूप मेहनत घेतली आहे.