

35720
कणकवलीत उड्डाणपुलाखाली तात्पुरते पार्किंग
नगराध्यक्ष, पोलिस निरीक्षकांच्या बैठकीत निर्णय; रस्त्यावर वाहने उभी केल्यास दंड
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ : कणकवलीत महामार्गावर तसेच बाजारपेठ रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाखालील वाहनांच्या पार्किंगची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. येथील नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे आदींच्या उपस्थितीत शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. यात उड्डाणपुलाखाली पार्किंगबाबतचा निर्णय घेण्यात आला.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूचे सेवा रस्ते, कणकवली बाजारपेठ तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी कॉलेज रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याखेरीज शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने वाहतूक कोंडीबाबत पोलिस प्रशासनालाही वेळेत माहिती कळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.
या बैठकीत उड्डाणपुलाखालील सेवारस्ता दुतर्फा कणकवली बसस्थानक ते गांगो मंदिर अंडरपास आणि बसस्थानक ते नरडवे तिठा या उड्डाणपुलाखालील जागेत दुचाकी व इतर वाहने पार्किंग करण्यास तात्पुरती परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने वाहतूक पोलिसांनी नियोजन करावे असे निर्देश नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले. या बैठकीस वाहतूक पोलीस दिलीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, रविंद्र म्हाडेश्वर तसेच नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, लुकेश कांबळी आणि सत्यजित पारकर उपस्थित होते.
---
आठवडा बाजारादिनीचेही नियोजन
दरम्यान, मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी पोस्ट कार्यालय परिसर, भालचंद्र महाराज मठ रस्ता आणि तेली आळी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागात कुठलीही वाहने उभी करू नयेत. तर सर्व वाहन चालकांनी नगरपंचायतीच्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्स परिसरात आपली वाहने उभी करावीत असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
---
सेवा रस्त्यावर पार्किंग तर दंड!
दरम्यान, या बैठकीत उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, बसस्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने या भागात विशेष नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही नगराध्यक्षांनी दिले.