

35774
हवे १०८ कोटी, मार्चअखेर शासनाकडून शून्य निधी
जलजीवनची गती कुंठीत; ४१.३२ टक्केच काम पूर्ण
रत्नागिरी, ता. ६ : ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ (२०२५-२६) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १४३२ नियोजित योजनांपैकी १४२८ योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ५९० योजनांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची सरासरी प्रगती ४१.३२ टक्के इतकी आहे. यामध्ये लांजा आणि मंडणगड तालुक्यांनी आघाडी घेतली आहे तर गुहागरमध्ये अगदी संथगतीने काम सुरू आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे १०८ कोटींची गरज आहे; परंतु मार्चअखेर एक पैसाही न आल्याने योजनेची कामे मंदावली आहेत.
लांजा तालुक्याने सर्वाधिक ६४.७५ टक्के कामे पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्या पाठोपाठ मंडणगड (६२.५० टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. गुहागर तालुक्यात केवळ २३.४२ टक्के योजना पूर्ण झाल्या असून, या ठिकाणी कामाची गती वाढवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्ह्यात संगमेश्वर, खेड आणि राजापूर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक योजना मंजूर आहेत. संगमेश्वर (२०८) आणि खेड (२०५) या तालुक्यांत कामांचा व्याप मोठा आहे. जिल्ह्यात एकूण ३५१ योजना अशा आहेत ज्यांचे काम ७५ ते १०० टक्के टप्प्यात पोहोचले आहे. लवकरच या योजनाही पूर्ण होऊन नागरिकांना लाभ मिळण्यास सुरवात होईल. ३०३ योजनांचे काम ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, १२४ योजना २५ ते ५० टक्के टप्प्यात आहेत.
जिल्हा परिषदेतर्फे नियमित आढावा घेऊन ज्या १५ योजना अद्याप ० टक्के प्रगतीवर आहेत त्यांना वेग देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. यामुळे ग्रामीण महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबण्यास मोठी मदत होणार आहे. ४५ योजनांचे काम २५ टक्के झाले आहे. १२४ योजनांचे काम ५० टक्के, ३०३ योजनांचे काम ७५ टक्के तर ३५१ योजनांचे काम १०० टक्के झाले आहे.
चौकट
तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजनांची टक्केवारी
लांजा - ६४.७५ टक्के
मंडणगड - ६२.५० टक्के
रत्नागिरी - ४४.५१ टक्के
दापोली - ४२.७७ टक्के
संगमेश्वर - ३८.९४ टक्के
चिपळूण - ३८.३५ टक्के
राजापूर - ३७.५६ टक्के
खेड - ३०.३९ टक्के
गुहागर - २३.४२ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.