

किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून
आंबा घाटातील थरार; सातारा जिल्ह्यातील संशयित आरोपीला अटक
सकाळ वृत्तसेवा
देवरुख, ता. ६ : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरातील दख्खन (कळकदरा) येथे ३१ मार्च रोजी घडलेल्या एका घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. मित्र गाडीतून पडल्याचा आणि अपघाताचा बनाव रचणारा व्यक्तीच प्रत्यक्षात खुनी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी देवरुख पोलिसांनी संशयित मित्राला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आशिष शांताराम भावके असे आहे. तर खून झालेल्याचे नाव सुधीर अर्जुन यादव असे आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण) आणि आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड) हे मित्र असून एकमेकांचे नातेवाईकही आहेत. हे दोघे रत्नागिरी येथे फिरायला आले होते. ''आरे-वारे'' समुद्रकिनारी त्यांनी जेवण केले. तिथून परतत असताना ३१ मार्च रोजी रात्री ११:३० च्या सुमारास आंबा घाटातील कळकदरा येथे त्यांच्यात वाद झाला.
मृत सुधीर यादव याने पुन्हा दारू पिण्याचा हट्ट धरल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या सुधीरने आशिषच्या कारच्या बोनेटवर चढून काच फोडली आणि गाडीचे नुकसान केले. याचा राग अनावर झाल्याने आशिषने गाडी भरधाव वेगाने चालू केली. सुधीर बोनेटवरून खाली पडल्यास त्याचा जीव जाऊ शकतो, हे माहित असूनही आशिषने गाडी थांबवली नाही. यात सुधीर खाली पडला आणि काही अंतर फरपटत गेल्याने त्याच्या बरगड्या, पोट आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर जखमी सुधीरला तशाच अवस्थेत सोडून आशिष तेथून पसार झाला होता. दुसऱ्या दिवशी सुधीरला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा केवळ अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी केलेल्या सखोल चौकशीत हा अपघात नसून रागाच्या भरात केलेला गुन्हा असल्याचे समोर आले.
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासासाठी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
....... बातमीदार.......दीपक कुवळेकर.....