देवगड आगाराचे नियोजन दोलायमान

देवगड आगाराचे नियोजन दोलायमान
Published on

35858
देवगड ः येथील बसस्थानक. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


देवगड आगाराचे नियोजन दोलायमान

काही फेऱ्या रद्द; पुरेशा गाड्या नसल्याने नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ : येथील एसटी आगारातील गाड्यांची कमतरता आणि अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ऐन उन्हाळी हंगामात आगाराचे नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरेशा गाड्यांअभावी सद्यःस्थितीत काही लांब आणि मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या बंद आहेत. त्यातच चालू महिन्यात आगारातील ५ गाड्यांचे आयुर्मान संपत असल्याने त्या निर्लेखनासाठी जाणार आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात आणखी काही फेऱ्या रद्द होऊन प्रवाशांसमोर मोठी समस्या उभी राहू शकते. सद्यःस्थितीत चालक आणि वाहक मिळून ५० कर्मचारी कमी असल्याचे आगार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागात ‘एसटी’ला जीवनवाहिनी मानले जाते; मात्र हीच सेवा आता कोलमडण्याच्या स्थितीत आहे. आगारातील एकूण फेऱ्यांच्या नियोजनासाठी सुमारे ४९ गाड्यांची आवश्यकता आहे, परंतु सध्या केवळ ४८ गाड्या कार्यरत आहेत. या महिनाअखेर ५ गाड्या भंगारात निघाल्यास केवळ ४३ गाड्याच शिल्लक राहतील.
सध्या बंद असलेल्या फेऱ्यांमध्ये सकाळी ६.४५ आणि ८ वाजताची सावंतवाडी गाडी, पहाटे ५ वाजताची नांदगावमार्गे रत्नागिरी गाडी आणि दुपारी १२.३० वाजताची फोंडामार्गे सांगली यांचा समावेश आहे. त्यामुळे ओरोसला रुग्णालयात किंवा कामानिमित्त जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना खासगी वाहनांनी किंवा गाड्या बदलत प्रवास करावा लागत आहे. गाड्यांची संख्या आणखी कमी झाल्यास सकाळी ११.३० ची पणजी, ८.३० ची रत्नागिरी आणि ११.५० ची बेळगाव फेरी बंद होऊ शकते. त्यातच शनिवारपासून (ता. ११) मुंबई मार्गावर नालासोपारा गाडी सुरू होणार असल्याने उपलब्ध गाड्यांवर प्रचंड ताण येणार आहे. तसेच, कणकवली आगाराची पहाटे ६.१५ ची फोंडा-तांबळडेग-मिठबाव ही फेरी बंद असल्याने रेल्वे प्रवाशांचीही अडचण होत आहे.
..........
ऐन लग्नसराईत फेऱ्या बंदची भीती
उन्हाळी हंगामात लग्नसराईमुळे प्रासंगिक करारासाठी (स्पेशल बुकिंग) एसटी गाड्यांना मोठी मागणी असते. अशावेळी नियमित फेऱ्या अचानक बंद करण्याची वेळ येऊ शकते. सध्या ५० कर्मचारी कमी असल्याने उपलब्ध चालक-वाहकांना ओव्हरटाईम करावा लागत असून त्यांच्यावरही कामाचा मोठा ताण आहे.
.........
गाड्यांअभावी नवीन फेऱ्या रखडल्या
देवगड-नांदेड आणि देवगड-भगवानगड अशा दोन नवीन फेऱ्या सुरू करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे; मात्र आगारात गाड्याच उपलब्ध नसल्याने या फेऱ्या सुरू करण्यात अडचणी येत आहेत. या गाड्या सुरू झाल्यास कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांची सोय होणार आहे.
.........
कोट
देवगड आगारामध्ये सद्यःस्थितीत चालक आणि वाहक मिळून सुमारे ५० कर्मचारी कमी आहेत. चालू महिन्यात सुमारे पाच एसटी गाड्यांचे आयुष्यमान संपत असल्याने त्या निर्लेखनासाठी जातील. अशावेळी आगारासाठी पुरेशा गाड्यांची वेळीच उपलब्धता झाली नाही, तर उन्हाळी हंगामात गाड्या कमी पडतील. सद्यःस्थितीत काही फेऱ्या बंद आहेत. गाड्यांची कमतरता भासल्यास आणखीही काही फेऱ्या बंद होऊ शकतात. कर्मचारी कमी पडत असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांना पुन्हा ड्युटीवर जाण्याची वेळ येते.
- आगार प्रशासन, देवगड एसटी आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com