तळाशीलमधील वाळू उपसा बंद

तळाशीलमधील वाळू उपसा बंद
Published on

swt816.jpg
36145
निलेश राणे

तळाशीलमधील वाळू उपसा बंद
आमदार निलेश राणे : किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांचा प्रश्न मार्गी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : जिल्हाधिकारी कार्यालयात सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत आज सकारात्मक तोडगा निघाला. तळाशील गावातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद राहणार असून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावत ८० टक्के जमिनी आपोआप नियमित झाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील निलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपस्थित होते. तळाशील येथील ग्रामस्थांनी वाळू उपसा आणि अनधिकृत बोटींच्या मुद्द्यावर आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यावर आमदार राणे म्हणाले की, तळाशील हा ‘नोटीफाईड स्पॉट’ असल्याने तिथे वाळू उपसा होऊच शकत नाही, याची १०० टक्के खात्री प्रशासनाने दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निसटलेल्या अनधिकृत बोटींच्या संदर्भात मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आज मी स्वतः तळाशील गावात जाऊन उर्वरित समस्यांची आणि मंजूर बंधाऱ्यांच्या कामाची पाहणी करणार आहे.
सीआरझेडच्या नोटिशींमुळे धास्तावलेल्या किनारपट्टीवरील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय धोरणानुसार ८० टक्के जमिनी या स्वयंचलित नियमित झाल्या आहेत. उर्वरित २० टक्के लोकांनाही विस्थापित केले जाणार नाही. कोळीवाडे आणि गावठाण विस्तार ज्या धर्तीवर मुंबईत नियमित झाले, त्याच धर्तीवर आपल्या भागातील गाबीत आणि भंडारी समाजाला जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत, असे राणे यांनी स्पष्ट केले.
भविष्यात ‘ग्रीन ट्रिब्युनल’मध्ये कोणी तक्रार केली तरी मच्छीमारांना त्रास होऊ नये, यासाठी हा कायमस्वरूपी तोडगा काढला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट
...म्हणूनच मत्स्य विभागावर मोर्चा
विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार राणे यांनी माजी आमदारांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, मागच्या १० वर्षात सीआरझेड आणि तळाशीलचे प्रश्न का सुटले नाहीत? तेव्हा का धाडस दाखवले नाही? फक्त टीका करणे यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. १० एप्रिल हा नारायण राणे यांचा वाढदिवस आहे. विकासकामांवर बोलायला काही नसल्याने, केवळ वाढदिवसाला गालबोट लावण्यासाठी मत्स्य विभागावर मोर्चा काढण्याचे राजकारण केले जात आहे. हे लोकांच्या हिताचे नसून संकुचित मनाचे दर्शन आहे. एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींवर ९० लाखांचा दंड ठोठावणारा मी पहिला माणूस होतो. मी कधीही चुकीच्या कामाला पाठीशी घातलेले नाही.

चौकट
मच्छीमारांना हक्क देण्यासाठी कटीबद्ध
विरोधकांनी कितीही टीका केली तरी मला फरक पडत नाही, उलट माझे चांगलेच होते. आम्ही प्रत्येक विषय पारदर्शकपणे सोडवत आहोत. किनारपट्टीचा मच्छीमार हाच तिथला खरा मालक आहे आणि त्याला तो हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com