

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजसाठी ग्रामपंचायतींची धांदल
माहिती भरण्याची लिंक सुरू : ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण अभियान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ ची मुदत संपली असून राज्यस्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीला केलेल्या कामाची माहिती भरण्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून ही लिंक ओपन केली असून १० एप्रिलपर्यंत माहिती भरण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची आपली माहिती ऑनलाइन सादर करण्याची धांदल सुरू झालेली आहे.
राज्य शासनाने ग्रामीण विकासाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी व त्यासाठी प्रशासनाला आवश्यक असलेले सहकार्य सर्व घटकांचे लाभण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर २०२५ पासून राबविण्यास सुरु केले होते. ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधतानाच नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या या अभियानाचा सुरुवातीला कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत होता. परंतु मध्येच निवडणूक आचारसंहिता आल्याने ही मुदत वाढवून ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली होती. राज्याच्या ग्रामीण विकासासाठी राज्य शासनाचे हे महत्वाकांक्षी अभियान आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ४३३ ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या होत्या. अभियान सुरू झाल्यावर सर्व सहभागी ग्रामपंचायतींना सद्य स्थितीत असलेली माहिती ऑनलाईन भरण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ऑनलाईन माहिती सादर केली होती. त्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींनी स्व मूल्यांकन केले होते. त्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार त्यातील टॉप २० ग्रामपंचायतींची निवड प्रत्येक तालुक्यात करण्यात आली होती. त्यातील काही निवडक गावाना सेलिब्रिटी भेटी देण्यात आल्या होत्या. आता यावर्षीची मुदत संपल्याने त्या गावांचे मूल्यांकन गटविकास अधिकारी यांच्या समितीमार्फत तालुका स्तरावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समिती कडून जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.
३१ मार्च २०२६ रोजी २०२५-२६ मधील या अभियानाची मुदत संपली. त्यामुळे १ एप्रिलपासून शासनाने ऑनलाइन माहिती सादर करण्यासाठी लिंक ओपन केली आहे. आता या लिंकवर ग्रामपंचायतींना अभियान कालावधीत केलेल्या कामांची माहिती भरायची आहे. या भरण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. प्रथम तालुकास्तरावरील समिती क्रॉस चेकिंग करणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात नंबर मिळविलेल्या ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय समिती भेट देणार आहे. ही माहिती भरण्यासाठी १० एप्रिल ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतींची याबाबतची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी धावपळ सुरू आहे.
चौकट
कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या समित्या करणार एकमेकांचे मूल्यमापन
तालुकास्तरीय मूल्यमापन क्रॉस पद्धतीने करण्यात येणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील तालुकास्तरीय समिती हे मूल्यमापन करणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून कोणत्या तालुकास्तरीय समित्या कोणत्या तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देणार आहेत, याबाबत जाहीर करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समित्यांना कोल्हापूर तालुक्यातील तालुके तर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके देण्यात आले आहेत. त्यानुसार देवगड आणि राधानगरी, दोडामार्ग आणि गडहिंग्लज, कणकवली आणि शिरोळ, कुडाळ आणि कागल, मालवण आणि भुदरगड, सावंतवाडी आणि करवीर, वैभववाडी आणि आजरा, वेंगुर्ला आणि चंदगड येथील तालुकास्तरीय समित्या एकमेकांच्या तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.