

आचऱ्यात २५ ला
गीत गायन स्पर्धा
आचरा : रॉयल मालवणी, सिंधुदुर्गतर्फे आचरा येथे जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २५ एप्रिलला दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत लौकिक सांस्कृतिक भवन, हॉटेल सिरॉक शेजारी, आचरा, येथे होणार आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा केली असून प्रथम पारितोषिक म्हणून चषक व रुपये ६६६६, द्वितीय पारितोषिक म्हणून चषक व रुपये ४४४४, तर तृतीय पारितोषिक म्हणून चषक व रुपये २२२२ देण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धकांना आकर्षक पदके, प्रमाणपत्रे, तसेच एक उत्तेजनार्थ पारितोषिकही दिले जाणार आहे. स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहेत. पहिल्या फेरीत स्पर्धकांना मराठी गीतातील मुखडा व पहिला अंतरा सादर करावा लागेल. या फेरीतून सर्वोत्तम १५ स्पर्धकांची निवड करून त्यांना दुसऱ्या फेरीत हिंदी गीत पूर्ण सादर करावे लागणार आहे. स्वरबद्धता, तालबद्धता, एक्सप्रेशन्स, गाण्याची निवड व एकूण सादरीकरण या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण होईल. स्पर्धकांनी नोंदणी निश्चित केल्यानंतर आपले दोन्ही कराओके ट्रॅक आयोजकांनी दिलेल्या ई-मेलवर पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सिद्धू सकपाळ, डॉ. अमोल हुले, तसेच संदेश रावले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------
कांदळगावात उद्या
संयुक्त जयंती उत्सव
मालवण : सिद्धार्थ विकास मंडळ व यशोधरा महिला मंडळ, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव बुद्धविहार कांदळगाव-सम्राट अशोक नगर येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता धम्म ध्वजवंदनाने होईल. सकाळी दहाला पूजाविधी व बुद्धवंदना आयोजित करण्यात येणार असून सकाळी १०.३० वाजता विद्यार्थी व मान्यवरांची मनोगते होतील. सायंकाळी साडेसातला प्रमुख आकर्षण म्हणून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ व त्यापुढील आव्हाने’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. प्राचार्य कैलास राबते (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण) हे प्रमुख वक्ते आहेत. रात्री ९ वाजता सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम होईल.