

लांजात गुरुवारी
महारक्तदान शिबिर
लांजा ः जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या लांजा केंद्रातर्फे संस्थापक नीलेश सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त १६ एप्रिलला महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर सकाळी आठ वाजता काळे छात्रालयात होईल. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य करण्याचा आदर्श या माध्यमातून ठेवण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. नावनोंदणीसाठी योगेश पांचाळ, राकेश राऊत यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चिपळूणमध्ये
नाटकांचे प्रयोग
चिपळूण : दहावी-बारावी परीक्षा संपल्या असून लवकरच इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षाही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात चिपळूणमधील नाट्यरसिकांसाठी विविध नाटकांचे आयोजन केले आहे, अशी माहिती नाट्यसंयोजक योगेश कुष्टे यांनी दिली. १७ एप्रिलला प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे ‘एकदा पहावं करून’ तसेच भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या अभिनयाने सजलेले ‘शंकर जयकिशन’ ही नाटके सादर होणार आहेत. अशाच दर्जेदार आणि मनोरंजनपूर्ण नाटकांचा खजिना चिपळूणकरांना अनुभवायला मिळणार असल्याने नाट्यप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
संस्था चालकांचा
भाजपतर्फे सत्कार
चिपळूण : चिपळूण शहर भाजपतर्फे घेण्यात आलेला संस्था चालकांचा सत्कार, त्या संस्थेला उभारी देणाऱ्यांचा सन्मान आहे. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले. शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचा स्थापना सोहळा व खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. ११) हा कार्यक्रम झाला. या वेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, पतसंस्थेच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, स्मिता चव्हाण, भाजप शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मकरंद जोशी, नॅबचे अध्यक्ष नीलेश भूरण आदी यावेळी उपस्थित होते. ठाकरे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते शेखर लवेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.