

37605
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महिला अधिकाऱ्याने छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख चुकीचा केल्याने आक्रमक झालेले सभागृह.
पहिल्याच सभेत समस्यांना फुटली वाचा
जिल्हा परिषद : शिक्षण, आरोग्य, रस्त्यांसह विविध प्रश्नांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ : पहिल्याच सभेत शिक्षण, आरोग्य, रस्ते यांसह ग्रामीण भागातील असंख्य समस्यांना आज सभागृहात वाचा फुटली. प्रशासनाकडून लोकनियुक्त सदस्यांकडे कारभार आल्यानंतर झालेल्या पहिल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायत मालकीच्या रस्त्यांचा सर्व्हे, धोकादायक शाळा, औषध पुरवठा चौकशी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, समाज कल्याण सभापती रुहिता तांबे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, वित्त बांधकाम सभापती संतोष साटविलकर, आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, भाजप गटनेते संजय बोबडी, शिवसेना गटनेते केशव नारकर, अपक्ष गटनेते नितीन राऊळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल फुंड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, संदेश सावंत, दीप्ती पडते, सुमेधा पाताडे, सोनाली घाडीगावकर, सावी लोके, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत मालकीचे असलेले २६ क्रमांकाचे रस्ते संख्येने अधिक आहेत. या रस्त्यांवर जिल्हा परिषदेला स्व निधी खर्च करताना मर्यादा येतात. त्यामुळे हे रस्ते जिल्हा ग्रामीण मार्ग करण्याचा ठराव करण्यासाठी सर्व रस्त्यांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय झाला. औषधसाठा शिल्लक असताना आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र याठिकाणी पुरेसा साठा नसल्याचे पुढे आल्याने याबाबत आरोग्य विभागाची चौकशीचे आदेश देण्यात आले. धोकादायक शाळा इमारतींचा सर्व्हे करण्याचेही ठरले.
चौकट
अधिकाऱ्यांना तंबी
सभेला अनेक खातेप्रमुख सभागृहात आवश्यक माहिती घेऊन आले नव्हते. काही अधिकारी गैरहजर होते. यामुळे संदेश सावंत म्हणाले, ‘‘गेली चार वर्षे अधिकाऱ्यांना प्रशासक राजवटीमुळे लोकप्रतिनिधींचा विसर पडला आहे. ही पहिलीच सभा असल्याने आपण सोडून देत आहोत; परंतु यानंतरच्या सर्वसाधारण किंवा विषय समिती सभेला येताना पूर्ण तयारीनिशी यावे.’’ गैरहजर रहायचे असल्यास अध्यक्षांची पूर्वपरवानगी घ्यावी; अन्यथा कारवाईला संबंधित जबाबदार असतील, अशी तंबी दिली. त्याला सभागृहाने पाठिंबा दर्शविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.