

भंगार दुचाकींतून काजू बीची अवैध वाहतूक
लांजा तालुक्यातील प्रकार; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांतून संताप
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १६ ः लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या काजू हंगामाची लगबग सुरू आहे; मात्र, या हंगामाच्या आड परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून भंगारमधील (स्क्रॅप) दुचाकींचा वापर करून काजू बीची सर्रास वाहतूक केली जात आहे. एकीकडे स्थानिक वाहनधारकांवर नियमांचा बडगा उगारणाऱ्या आरटीओ प्रशासनाकडून या अवैध वाहनांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी काजू हंगाम सुरू झाला की, उत्तरप्रदेश आणि बिहारमधून आलेले परप्रांतीय व्यावसायिक तालुक्याच्या दुर्गम भागात डेरेदाखल होतात. ग्रामीण भागात टोस्ट-बटर किंवा इतर वस्तूंच्या बदल्यात काजू बी खरेदी करण्याचा व्यवसाय यांच्याकडून केला जातो. या काजू बीची ने-आण करण्यासाठी अत्यंत दुरवस्था झालेल्या आणि भंगारात काढलेल्या अनेक जुन्या दुचाकींचा वापर केला जात आहे. यातील बहुतांश गाड्यांना नंबरप्लेट नाहीत तर काहींचे कागदपत्रेही अस्तित्वात नाहीत. शासनाने सर्व वाहनांसाठी एचएसआरपी नंबरप्लेट अनिवार्य केली आहे; मात्र, या परप्रांतीयांच्या गाड्यांना साधी नंबरप्लेटही नसल्याने ‘आरटीओ’चे (प्रादेशिक परिवहन कार्यालय) नियम फक्त कागदावरच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे आरटीओ आणि पोलिस प्रशासन स्थानिक वाहनधारकांकडे नंबरप्लेट नसली किंवा कागदपत्रे अपूर्ण असली की, तत्काळ दंडात्मक कारवाई करते; मात्र, डोळ्यादेखत तालुक्यातील रस्त्यांवरून धावणाऱ्या या भंगार गाड्यांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
------
कोट
स्क्रॅपमधील गाड्यांवर कारवाई केली जाते; परंतु परप्रांतीय काजू बी खरेदीसाठी वापरण्यात येणाऱ्या जुन्या गाड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
- संतोष कांबळे, नागरिक, लांजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.