सभागृहात पुन्हा‘जनतेचा आवाज

सभागृहात पुन्हा‘जनतेचा आवाज
Published on

swt1610.jpg
37710
सिंधुदुर्गनगरी : चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधी, सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने गजबजलेले छत्रपती शिवाजी महाराज सभागृह.

सभागृहात पुन्हा ‘जनतेचा आवाज’
जिल्हा परिषद : तब्बल चार वर्षानंतर ग्रामीण प्रश्नांवर ठोस चर्चा
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ :तब्बल चार वर्षांच्या शांततेनंतर जिल्हा परिषद सभागृहात पुन्हा एकदा ‘जनतेचा आवाज’ घुमला आणि छत्रपती शिवाजी महाराज सभागृह अक्षरशः सजीव झाले.बुधवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे ठरली.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, विविध सभापती, गटनेते, सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचा खरा गाभा ठरला तो लोकप्रतिनिधींचा पुन्हा उमटलेला बुलंद आवाज.
गेल्या काही वर्षांत प्रशासकीय राजवटीमुळे सभा होत असल्या, तरी त्या केवळ कागदोपत्री माहितीपुरत्याच मर्यादित राहत होत्या. गावागावांतील समस्या मांडणारे लोकप्रतिनिधीच नसल्याने अनेक प्रश्न ‘फाईल’मध्येच अडकून पडले होते. मात्र, यावेळी चित्र पूर्णपणे बदललेले होते. नव्या सभागृहाची पहिलीच बैठक असल्याने सदस्यांमध्ये उत्साह, अभ्यास आणि जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे जाणवत होती.
धोकादायक शाळांचे सर्वेक्षण, रस्त्यांची दुरवस्था व त्यांचे जिल्हा ग्रामीण मार्गांत रूपांतर, आरोग्य सेवांतील त्रुटी, औषधांचा तुटवडा, शिक्षणातील अडचणी अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा रंगली. अनुभवी सदस्य संदेश सावंत, संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, सुमेधा पाताडे, संजय बोबडी, सावी लोके, मायकल डिसोझा यांनी आपल्या अनुभवाची छाप पाडली; तर तुकाराम साईल, रूपेश कानडे, संदीप गावडे, संजय गावडे, मनोज रावराणे, केशव नारकर, प्रमोद रावराणे, सुप्रिया वालावलकर या नव्या चेहऱ्यांनीही प्रभावी मांडणी करत आपणही तितकेच सक्षम असल्याचे दाखवून दिले.
अध्यक्ष कामत यांनी सभागृहाच्या भावना ओळखून प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देत ठाम भूमिका घेतली. सदस्यांच्या मागण्या मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ही सभा केवळ चर्चेपुरती न राहता कृतीकडे वाटचाल करणारी ठरली.
लोकशाहीत जनतेचा खरा आवाज हा लोकप्रतिनिधींच्याच माध्यमातून प्रभावीपणे पुढे येतो. प्रशासन सक्षम असले तरी लोकांच्या प्रश्नांना दिशा आणि वेग देण्यासाठी सक्रिय लोकप्रतिनिधित्व आवश्यक असते. चार वर्षांनंतर झालेल्या या सभेमुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना आता नवी दिशा आणि अपेक्षित गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र, सभागृहात उमटलेला हा आवाज पुढील काळात प्रत्यक्ष कामांत उतरला, तरच या सभेचे खरे यश ठरेल, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
--------------
चौकट
सभाशास्त्राचा अभाव ठळक
सभागृहात चर्चा रंगली असली तरी सभाशास्त्राच्या दृष्टीने काही त्रुटी जाणवल्या. ‘सन्माननीय’ या औपचारिक संबोधनाऐवजी अनेक सदस्य ‘साहेब’ असा शब्द वापरत होते. प्रश्न मांडताना योग्य संबोधनाची शिस्त पाळणे आवश्यक असून, नव्या सदस्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
--------

नावफलकांमुळे ओळख
पहिलीच सभा असल्याने सदस्यांची ओळख व्हावी, यासाठी प्रशासनाने प्रत्येक खुर्चीवर नावफलक लावले होते. त्यामुळे नव्या-जुन्या सदस्यांमधील संवाद सुलभ झाला आणि सभागृहाचे कामकाज अधिक सुव्यवस्थित वाटले.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com