

38059
खत साठ्यात तफावत नको
कृषी आयुक्त : विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ : कृषी केंद्र चालक आणि त्यांच्याकडील खतविक्रीनंतरचा शिल्लक साठा आणि पॉस मशीनमधील साठा यांचा रोज ताळमेळ असणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या तपासणीमध्ये तफावत आढळल्यास कडक कारवाईचे आदेश कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत. या महिनाअखेर राज्यभर कृषी विभागाकडून खतांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कोणतीही अनियमितता आढळल्यास दोषीवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत कृषी आयुक्तांनी दिले आहेत.
खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांच्या पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोहीम स्वरूपात कारवाई चे आदेश दिले आहेत. खत विक्री केंद्रावर साठा फलक व किंमत सूची अद्ययावत असणे, खतांचा साठा व विक्री नोंदवही प्रत्यक्ष साठ्याशी जुळणे, लिंकिंगला नाही म्हणा, बोर्ड विक्री केंद्रावर प्रदर्शित करणे, अनधिकृत व विनापरवाना खत विक्रीवर बंदी, जास्त युरिया खरेदी करणाऱ्यांची तपासणी करणे व ई-पॉस मशीन व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व खत विक्रेत्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या रासायनिक खतांचा एकूण २२१४ मॅट्रिक टन इतका खत साठा उपलब्ध आहे. पैकी ३१२ मॅट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक आहे. तसेच युरियाचा ४५० मे.टन व डीएपीचा १५ मे.टन संरक्षित साठा मंजूर आहे. एप्रिल महिन्यापासून केलेल्या कृषी केंद्र तपासणीमध्ये एकूण ९ विक्री केंद्राच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आल्याने कृषी अधिकारी, गुणनियंत्रण, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने संबंधितांवर कारवाई प्रस्तावित केली. त्यामुळे अद्ययावत खतसाठा नोंद ठेवण्याची जबाबदारी कृषी केंद्र चालकांची आहे.
सर्व खत विक्री केंद्रांनी त्यांच्या पॉस मशीनवरील खतसाठा आणि प्रत्यक्ष गोडावूनमधील शिल्लक साठा यांचा ताळमेळ वेळच्यावेळी अद्ययावत करावयाचा आहे. जर विक्रेत्यांच्या पॉस मशीनवरील खत साठा प्रत्यक्ष शिल्लक असलेल्या खत साठ्यांशी जुळत नसेल तर अशा विक्रेत्यांविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्य वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.