

युद्धाच्या अर्थझळा........... लोगो
(१८ एप्रिल टुडे १०२)
जगाच्या आर्थिक रचनेत बदल शक्य
युद्धामुळे अनेक देशांचं महत्त्व आणि अस्तित्व संपून जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नवी आर्थिक घडी, आर्थिक व्यवस्था उभी राहू शकते. चालू व्यवस्थेच्या जागी नवीन व्यवस्था उभ्या राहू शकतात. प्रचंड उलथापालथ होऊ शकते. जगातल्या काही शक्तींनी या सगळ्या संकटावर तोडगा काढलाय. तो आहे डिडॉलरायझेशन. त्यामधून आणखी तीन उपाययोजना येतात. नोटबंदी, डिरेडिकलायझेशन’ आणि ‘डिकॉलनायझेशन’. हे चार डी म्हणजे एका अत्यवस्थ पेशंटचा जीव वाचवण्यासाठी करावी लागणारी अतिशय गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ चालणारी शस्त्रक्रिया आहे.
- सीए मुकुंद मराठे, रत्नागिरी
---
डिडॉलरायझेशन समजून घेण्याआधी डॉलरायझेशन कसं घडवलं, ते बघूया. दुसरं महायुद्ध संपलं, अमेरिका जगाची महासत्ता झाली होती मग आर्थिक महासत्ता होण्यासाठी १९७० मध्ये आणि १९८० च्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या घटना घडवल्या गेल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर अत्यंत वेगाने औद्योगीकरण होत गेलं. इंधनाचं महत्त्व वाढत गेलं. ज्याच्याकडे इंधन त्याची सत्ता अशा समीकरणाकडे वाटचाल सुरू झाली. आखाती देशात इंधन होतं आणि अमेरिकेकडे पैसा आणि शक्ती होती. यातूनच आखाती करार झाला. आखाती देशांनी तेल अमेरिकी चलनामध्ये विकायचं आणि बदल्यामध्ये अमेरिका या देशांचं संरक्षण खर्च करणार. यानंतर डॉलरला प्रमुख राखीव चलन, अशी मान्यता मिळाली ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकन डॉलर्समध्ये होऊ लागला. सर्व जग डॉलरच्या दिशेने अक्षरशः वेड्यासारखं पळायला लागलं आणि अमेरिका जगाची अनभिशक्त शक्ती झाली, यालाच डॉलरायझेशन म्हणता येईल.
या व्यवस्थेला जेव्हा जेव्हा आव्हान दिलं गेलं तेव्हा तेव्हा ते आव्हान संपवण्यात आलं. जग दोन गटात विभागलं गेलं, एका गटाला नेहमी बळ दिलं गेलं आणि दुसऱ्या गटावर निर्बंध लादण्यात आले. जे ब्रह्मांडी तेच पिंडी या नियमाने ही फूट समाजात खालपर्यंत पडत गेली. ज्याला बळ दिलं गेलं ती बळ देणाऱ्याची वसाहत झाली. ही वसाहतवादाची प्रक्रिया होती. धार्मिक उन्मादाला बळ देण्यात आलं. हा सुद्धा वसाहतवादाचाच प्रकार होता. एक भाषा, एक प्रकारचा पोशाख, एक प्रकारची जीवनपद्धती रूढ करण्याचा प्रयत्न झाला, सांस्कृतिक वसाहतवाद तयार करण्यात आला. यासाठी प्रचंड पैशांची आवश्यकता होती म्हणून प्रथम नोटा छपाई आणि सोन्याचा साठा यांचा एकमेकांशी राखलेला संबंध तोडला गेला. अमर्याद चलन छापलं गेलं यालाच फियाट करन्सी असे संबोधलं जातं. त्याचबरोबर व्याजाचे दर अत्यल्प किंवा शक्य असेल तर शून्य ठेवण्यात आले. अमाप आणि स्वस्त पैसा उपलब्ध करण्यात आला आणि अमेरिकाप्रधान अर्थव्यवस्था सुखाने नांदू लागली.
१९८०च्या दशकामध्ये चीनचा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उदय झाला, अमेरिकेने पैसे पुरवायचे आणि चीनने उत्पादन करायचं आणि ते डॉलरच्या विनिमयामध्ये जगाला विकायचे, अशी व्यवस्था उभी केली गेली. याप्रकारे समृद्ध मिडल ईस्ट आणि समृद्ध चीन उभे राहिले. २००८ मध्ये आलेल्या जागतिक अर्थसंकटाने या संपूर्ण डॉलर आधारित अर्थव्यवस्थेला निर्णायक दणका दिला. यामध्ये अमेरिका आणि इतर काही देशातल्या मोठमोठ्या बँका बुडाल्या, याला सबप्राइम क्रायसिस म्हटलं गेलं. या संकटाचा केंद्रबिंदू खुद्द अमेरिकाच होता. यानंतर २०१९ मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे तर जगाचा अमेरिका आधारित अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडत गेला आणि अमेरिकाप्रधान अर्थव्यवस्था डळमळीत झाली. चालू आखाती युद्धाने १९७० च्या दशकात अस्तित्वात आलेल्या आखाती कराराद्वारे आखाती देशांच्या पूर्ण सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेने घेतली आहे; पण त्यात ती कितपत यशस्वी आहे, यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आता अनेक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. आता अमेरिका व डॉलरप्रधान अर्थव्यवस्थेला पर्याय शोधलाच पाहिजे, अशी खात्री वाटू लागली त्याप्रमाणे रचना बदलल्या गेल्या. जगातले मोठमोठे देश आपापल्या चलनामध्ये द्विपक्षीय व्यापार करू लागले. देश आत्मनिर्भरतेची भाषा बोलू लागले. भविष्यात कदाचित मुक्तपणे आपापसात द्विपक्षीय देवाणघेवाण केली जाऊ शकते. यातूनच डिकॉलनायझेशनची प्रक्रिया जोर पकडू शकते तसेच अमर्याद नोटा छापण्याचे दुष्परिणाम कळल्याने परत एकदा नोटा छपाई व सोने यांचा संबंध घातला जाऊ शकतो. म्हणजेच जग एका अनेक दशकं चालू असलेल्या व्यवस्थेकडून दुसऱ्या पर्यायी रचनेकडे जायचा प्रयत्न करत आहे. याला प्रस्थापित व्यवस्थेचा प्रखर विरोध सहन करावा लागेल. प्रचंड गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रियेची सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल म्हणून याला संक्रमण काळ असे म्हणता येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.