

38518
सर्वोदयनगरात मूलभूत सुविधांची वाणवा
नागरिक आक्रमक; सावंतवाडी नगरपरिषदेवर धडक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० : शहरातील सर्वोदयनगर येथील रस्ते, गटारे आणि इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत येथील त्रस्त नागरिकांनी आज नगरपरिषदेवर धडक दिली. आपल्या विविध मागण्यांचे गाऱ्हाणे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासमोर मांडत, या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावेळी ३० एप्रिलपर्यंत कामे मार्गी न लागल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी शांततामय मार्गाने उपोषण करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला. दरम्यान, रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया (टेंडर) पूर्ण झाली असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडीकरणाचे काम हाती घेतले जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
सर्वोदय नगर परिसरात गेल्या काही महिन्यांत पाणी आणि गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदले आहेत. काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. रस्ते खड्डेमय झाल्याने आणि धुळीचे प्रमाण वाढल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्यावर्षीच दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा खणून ठेवल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. परिसरातील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि कचरा साचला असून, सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ही समस्या वेळीच न सोडवल्यास साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. तसेच विजेच्या तारा आणि इंटरनेट केबल्सचे अस्ताव्यस्त जाळे अपघाताला निमंत्रण देत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून सेवा दिली जात असली, तरी बिल भरण्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्राहकांना दिली जात नाही. याच गोंधळाचा फायदा घेऊन सर्वोदय नगरमधील एका महिलेला गॅस कंपनीच्या नावे आलेल्या ‘फ्रॉड कॉल’द्वारे लाखो रुपयांचा गंडा बसला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरसेविका निलम नाईक यांनी संबंधित गॅस अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. शहरात सर्वांत प्रथम सेवा या भागात सुरू झाली असताना, अद्याप ग्राहकांना पेमेंट पद्धतीची माहिती का दिली गेली नाही? असा प्रश्न करत त्यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
---------
...तर आंदोलनावर ठाम
नगरसेविका निलम नाईक यांनी या सर्व प्रश्नांबाबत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे लक्ष वेधले असून, कामांच्या मंजुरीसाठी स्थायी समितीची विशेष बैठक लवकरच आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी सर्वोदय नगर महिला कमिटीसह गुरुदत्त कामत, दीक्षा कामत, कविता नाईक, मेघना राऊळ, शरयू बार्देसकर, संभाजी नाईक, सिद्धेश नेरूरकर, योगेश कुलकर्णी, गुंडू साटेलकर आदी उपस्थित होते. ३० एप्रिलपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.