देवरूख ः ​शिक्षकांच्या खांद्यावर प्रशासनाचा भार

देवरूख ः ​शिक्षकांच्या खांद्यावर प्रशासनाचा भार
Published on

शिक्षकांच्या खांद्यावर प्रशासनाचा भार
बीएलओंना पूर्णवेळ कार्यमुक्तचे आदेश : शिक्षक मेटाकुटीला
देवरूख, ता. २०ः निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण मोहिमेमुळे शिक्षकांच्या खांद्यावर प्रशासनाचा मोठा भार पडला आहे. बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना आता पूर्णवेळ निवडणूक कामासाठी कार्यमुक्त करा, असे आदेश दिले आहेत. एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, पटपडताळणी आणि आगामी जनगणनेची पूर्वतयारी अशा कामांचे वेळेचे बंधन असताना ही अतिरिक्त जबाबदारी अंगावर आल्याने शिक्षक पूर्णपणे मेटाकुटीला आले आहेत.
राज्यात लवकरच मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण अभियान राबवण्यात येणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णतः सक्रिय झाली आहे. २३ ऑगस्ट २०१७च्या शासननिर्णयानुसार, बीएलओसारख्या कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच पर्यवेक्षक यांच्यावर मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मतदार नोंदींची पडताळणी करून माहिती अचूक ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.​ या कामासाठी १४ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत शिक्षकांना शाळेतून कार्यमुक्त होऊन पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. या कालावधीत कामात कोणतीही ढिलाई किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

चौकट
शैक्षणिक कामकाजावर परिणाम
सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू असून, पटपडताळणीही केली जात आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवणे, पेपर तपासणी, निकाल तयार करणे आणि इतर शैक्षणिक पोर्टलवर माहिती भरणे, या कामांमध्ये शिक्षक व्यस्त आहेत. याच काळात शिक्षकांना १० दिवस कार्यमुक्त केल्यामुळे शालेय कामकाजाचे नियोजन कोलमडणार आहे तसेच उन्हाळी सुट्टीतही जनगणनेची कामे प्रस्तावित असल्याने शिक्षकांना हक्काच्या सुट्टीतही कर्तव्य बजावावे लागणार आहे. अशा विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आता विविध शिक्षक संघटनांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com