गोपुरी आश्रमात महिला मेळावा

गोपुरी आश्रमात
महिला मेळावा
Published on

गोपुरी आश्रमात
महिला मेळावा
कणकवली : जिल्ह्यात विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या निवृत्त बौद्ध अधिकारी-कर्मचारी संघाने शनिवार, २५ एप्रिल रोजी वागदे येथील गोपुरी आश्रम येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता उद्‍घाटन गोपुरी सभागृहात निवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रोहिता तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘महिलांचे आरोग्य’ विषयावर डॉ. नीलिमा इनामदार, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कणकवली, डॉ. शमिता बिरमोळे (स्त्री रोगतज्ज्ञ कणकवली), ‘महिलांचे आर्थिक सक्षमीकरण’ विषयावर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सिंधुदुर्गच्या कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे, कुडाळ एमआयडीसीचे उद्योजक मुकुल कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते सायं. ४.३० असा असून सकाळी उद्घाटन व मान्यवरांचे मार्गदर्शन, दुसऱ्या सत्रात महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सहभागी व्हावे, असे आवाहन श्रद्धा कदम, रूपाली पेंढुरकर, ममता जाधव, आरती कदम, वृषाली जाधव, स्वाती कदम, प्रणाली कासले यांनी केले आहे.
-------
रस्ता रुंदीकरणाला
आजपासून प्रारंभ
सावंतवाडी : धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे राज्यमार्गावरील रुंदीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन उद्या (ता. २१) सकाळी ११ वाजता सांगेली जायपेवाडा येथे होणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले आहे. या भागातील हा रस्ता अरुंद होता. मात्र, आता हा रस्ता रुंद झाला असून वाहतुकीस सुरळीत झाला आहे. तसेच सांगेली येथील वळण काढून तेथे सरळ मार्ग झाला आहे. या रस्त्याचे उद्‍घाटन पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, तालुका प्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी केले आहे.
-----------
कसालला मेमध्ये
नारद जयंती उत्सव
वेंगुर्ले : भगवद्भक्ती प्रबोधिनी, सिंधुदुर्गचा नारद जयंती उत्सव व वार्षिक सर्वसाधारण सभा आत्माराम (उमेश) निगुडकर यांच्या स्मरणार्थ निगुडकर परिवार, कसाल यांच्या सहकार्याने ७ मे रोजी आयोजित केली आहे. अन्नपूर्णा मंगल कार्यालय, कसाल येथे ही सभा होईल. यावेळी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सिंधुदुर्गातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनचक्र सादर होणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल. या कार्यक्रमाला सर्व सभासद, कीर्तनकार, साथीदार, कीर्तनप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भगवद्भक्ती प्रबोधिनीचे अध्यक्ष संजय पुनाळेकर, कार्यवाह दिनकर प्रभू-केळुसकर व निगुडकर कुटुंबीयांनी केले आहे.
----
गणित प्राविण्य परीक्षेत
सावंतवाडी शाळेचे यश
मळगाव : गणित प्राविण्य परीक्षेत सावंतवाडी शाळा नं. २ च्या सहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले. गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामध्ये साहिल खरात, श्रीकर शुक्ल, पूर्वांग मळगावकर, स्वामिनी कोळी, सानवी देसाई आणि श्रीशा प्रभुदेसाई या सहा विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रणजीत सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालक-शिक्षकांची एकत्रित मेहनत यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर यांनी सांगितले.
------
पारपोलीत मंदिरास
१० लाखांचा निधी
सावंतवाडी : पारपोली येथील ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून १० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात पार पडले. या विकासकामामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार असून, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
---
वेतोरे-पालकरवाडीत
२१, २२ रोजी नाटक
वेंगुर्ले : वेतोरे-नमसवाडी बसस्टॉप येथे शेळीतल्याची कृपा मित्रमंडळातर्फे २१ रोजी दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त रात्री ९ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. बुधवारी २२ रोजी रात्री ९ वाजता सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळ, पावशी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com