भ्रष्टाचाराच्या क्लिप भर चौकात लावा

भ्रष्टाचाराच्या क्लिप भर चौकात लावा
Published on

38537

भ्रष्टाचाराच्या क्लिप भर चौकात लावा

कांदळगावकर : बाबी जोगी यांना खुले आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी माझ्या भ्रष्टाचाराच्या क्लिप भर चौकात लावण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ते नक्की करावे. त्यासाठी लागणारा सर्व खर्च द्यायला तयार आहे, अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी बाबी जोगी यांना जाहीर आव्हान दिले. जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे दाखवता, तेव्हा चार बोटे स्वतःकडे असतात याचे भान ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
बाबी जोगी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली बाजू मांडली आहे. कांदळगावकर यांनी म्हटले आहे, ज्या ऑडिओ क्लिपबाबत बोलले जात आहे, तो प्रकार सहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी मी तुमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष होतो. जर आमच्या कार्यपद्धतीवर पक्ष नाराज होता, तर तेव्हा आमचा राजीनामा का मागितला नाही? उलट आमच्या काळात पक्षाचे नगरसेवक वाढले. २०२२ मध्ये जेव्हा आम्ही राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक आम्हाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी आमच्या घरी का आले होते? त्यावेळी खासदारांनी माझे कौतुक केले होते, मग आताच मी भ्रष्टाचारी कसा झालो? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
बाबी जोगी यांच्यावर गंभीर आरोप करताना कांदळगावकर म्हणाले, ‘शिवसेना शहरप्रमुख पदाचा वापर करून मटका, जुगार आणि ठेकेदारांकडून हप्ते घेणाऱ्यांनी आम्हाला नीतीमत्ता शिकवू नये. कोळंब पूल आणि आडारी येथील ठेकेदारांकडे तुम्ही काय कारनामे केले, याची चर्चा आजही सुरू आहे. पारंपरिक मच्छीमारांचे नेते म्हणून मिरवायचे आणि पर्ससीन बोटींवर कारवाई झाली की मालकांशी ‘सेटलमेंट’ करायची, हा तुमचा खरा चेहरा आहे.’
आम्ही नेत्यांवर नव्हे, तर प्रशासकीय राजवटीत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मनमानी कारभारावर बोट ठेवले होते. आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनावर अंकुश ठेवला असता, तर अनेक विकासकामे पूर्ण झाली असती. भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराशी आमचे हितसंबंध होते, असा आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, आमचा कार्यकाळ संपल्यानंतर २०२१ ते २०२४ या काळात आपल्या आमदारांनी ते टेंडर रद्द का केले नाही? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
-----------
जावकरांच्या सल्ल्याचाही समाचार
महेश जावकर यांनी दिलेल्या सल्ल्याचाही कांदळगावकर यांनी समाचार घेतला. ‘आम्ही २०१६ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढलो आणि आजही त्याच पक्षात आहोत. उलट, नगरपालिका निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाच्या नेत्यांना गुपचूप भेटलात, याचा पूर्ण लेखाजोखा आमच्याकडे आहे. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी तुम्ही देवगड आणि कुंभारमाठचे उंबरठे किती झिजवले, हे आम्हाला ठाऊक आहे. स्वतःच्या प्रभागात दोनदा पराभव स्वीकारणाऱ्यांनी इतरांना पात्रतेच्या गोष्टी सांगू नयेत,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. शेवटी केवळ वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी वायफळ बडबड करू नका, असा सल्लाही कांदळगावकर यांनी बाबी जोगी आणि महेश जावकर यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com