चिपळूण-कामगार पश्चिम बंगालला गेल्याने कामे मंदावली

चिपळूण-कामगार पश्चिम बंगालला गेल्याने कामे मंदावली
Published on

rat21p15.jpg-
38713
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम.
-------------

कामगार पश्चिम बंगालला गेल्याने कामे मंदावली
महामार्गासह इतर बांधकामे रखडली; मतदानासाठी रवाना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आलेले पश्चिम बंगालमधील कामगार निवडणुकीसाठी गावी गेले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील इतर बांधकामांची गती मंदावली आहे. कामगार नाही तर मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग वेळेत कसा पूर्ण होणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित काम मे महिन्यात पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात कामाची गती पाहता हे काम पावसाळा संपेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावरील काही उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम शिल्लक आहे. या कामाचा ठेका घेतलेली एजन्सी ही परराज्यातील आहे आणि कामगारही परराज्यातील आहेत. यातील बहुतांशी कामगार हे पश्चिम बंगालमधील आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात बिल्डरांकडून इमारती उभारल्या जात आहेत. या इमारतींच्या सेंट्रिंग, गवंडी काम आणि प्लास्टरच्या कामासाठी पश्चिम बंगालमधील कामगार मोठ्या प्रमाणावर काम करतात. कामाचा दर्जा आणि स्थानिकांपेक्षा कमी पगारात हे कामगार काम करतात त्यामुळे बिल्डर आणि ठेकेदार बंगालमधील कामगारांना प्राधान्य देतात. पश्चिम बंगालमध्ये त्यांची मतदार यादीत नावे आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मतदान केले नाही तर पुढच्या निवडणुकीत मतदार यादीतून नाव वगळले जाईल, मतदान ओळखपत्र रद्द होईल, अशी भीती येथे कामासाठी आलेल्या बंगाली कामगारांमध्ये आहे. त्यामुळे हे कामगार पश्चिम बंगालला गेले आहेत. त्याचा फटका येथील बांधकामांना बसला आहे.
-------------
चौकट
निकालानंतरच कामगारांची वापसी
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला १५२ जागांसाठी मतदान होईल तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिलला उर्वरित १४२ जागांवर प्रक्रिया पार पडेल. निवडणूक निकालानंतरच कामगार परत जिल्ह्यात येतील, असा अंदाज बांधला जात आहे.
--------------
कोट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाहनांवर काम करणारे चालक तसेच सेंट्रिंगचे काम करणारे बहुतांशी कामगार हे पश्चिम बंगालमधील आहेत. ते निवडणुकीसाठी गावी गेल्यामुळे महामार्गाच्या कामावर थोडा परिणाम झाला आहे. आठवड्यानंतर कामगार पुन्हा येतील आणि कामाला पुन्हा गती मिळेल.
- विकास शर्मा, मुकादम, चेतक कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com