

38774
38775
सोळा एकर आंबा, काजू बागेला आग
कांदळगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; लाखो रुपयांचे नुकसान, शेतकरी हवालदिल
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : कांदळगाव (ता. मालवण) येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या मालकीच्या सुमारे १६ एकर बागायती क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना आज घडली. या आगीत आंबा व काजू बागायतीसह इतर झाडांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच सरपंच रणजित परब यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना सतर्क केले. त्यानंतर लगतच्या कोळंब व हडी गावांतील ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात अण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी मालवण नगरपरिषदेकडून अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. मात्र, बंब नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर स्थानिकांच्या मदतीवरच आग नियंत्रणात आणण्याची वेळ आली.
चंद्रशेखर परब हे मुंबई येथे वास्तव्यास असून त्यांनी बागेची देखभाल दिलीप पांडुरंग साळकर यांच्याकडे सोपवली आहे. दिलीप साळकर यांच्यासह सरपंच रणजित परब, प्रमोद कांडरकर, साक्षी कांडरकर, बाबू सुर्वे, तुषार साळकर, नागेश साळकर, राजन साळकर, बापू गावकर आणि इतर ग्रामस्थांनी अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. दरम्यान, एप्रिल व मे महिन्यात उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. अशा काळात अग्निशमन यंत्रणा सज्ज असणे अत्यावश्यक असताना नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त असल्याची बाब गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
--------------
इतर झाडांसह साहित्याचे नुकसान
या बागेत सुमारे ५५० आंबा कलमे, १५० काजू कलमे, ५० नारळाची झाडे, तसेच इतर सुमारे ५० झाडांचा समावेश होता. विशेष म्हणजे ही घटना ऐन आंबा काढणीच्या हंगामात घडल्याने परब कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय सुमारे २०० मीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन देखील आगीत जळून खाक झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.