

38741
सरकारी, निमसरकारी कर्मचारी संपावर
संमिश्र प्रतिसाद : जिल्हा मुख्यालयात निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ : सरकारी-निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली, कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
दरम्यान उद्यापासून (ता.२२) धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा करत शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मागील १५ महिन्यांपासून सात वेळा लक्षवेधी आंदोलने करूनही मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ न दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवले असून, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही समितीने दिला आहे.
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तत्काळ अंमलबजावणी करा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व त्यानंतरच्या पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, चतुर्थश्रेणी कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी आदी प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.
आंदोलन राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर आणि सचिव सत्यवान माळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यात राजू वज्राटकर, अजय शिंदे, राजन वालावलकर, अमोल भूतल, एम.जी. गवस, एस.एल. सपकाळ यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.
ठप्प की, सुरळीत
आम्ही आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सज्ज आहोत. शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करू, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील बहुतांश कर्मचारी संपात सहभागी असल्याने शासकीय कामकाज पूर्णतः ठप्प झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने मात्र कामकाज सुरळीत असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्हा महसूल यंत्रणेतील एकूण ६५८ कर्मचाऱ्यांपैकी ४८३ कर्मचारी संपात सहभागी आहेत, तर १४२ कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहेत. ३३ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.