

पुरवणी डोके:
श्री देवी माऊली पंचायतन पंचकुंडी पुनःप्रतिष्ठापना सोहळा, वाफोली
swt233.jpg व swt234.jpg
39114, 39115
वाफोली : श्री देवी माऊली मंदिर.
swt235.jpg व swt236.jpg
39116, 39117
वाफोली : श्री देवी माऊली पंचायतन मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
swt237.jpg
39118
वाफोली : मंदिराचा आतील भाग.
वाफोलीवासीयांचे अढळ श्रद्धास्थान
- विलास गवस, अध्यक्ष, देवस्थान समिती, वाफोली
लीड
वाफोली हे बांदा शहराला लागून असलेले देखणे, निसर्ग संपन्न आणि सुसंस्कृत गाव. सिंधुदुर्गात याची आदर्श गाव म्हणून ओळख आहे. शेती बागायतीने नटलेल्या आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या या गावाला समृद्ध धार्मिक वारसा लाभला आहे. श्री देवी माऊली पंचायतन हे येथील प्रमुख देवस्थान. ग्रामस्थांच्या श्रद्धा या देवस्थानाशी एकरूप झाल्या आहेत. या पंचायतन मंदिराचा भव्य ‘पंचकुंडी पुनःप्रतिष्ठापना सोहळा’ शुक्रवारी होत आहे. या निमित्ताने...
----
हिरव्यागार वनश्रीने नटलेले निसर्गरम्य गाव म्हणजेच वाफोली. वाफोलीच्या पूर्वेस मांजरडोंगरी आहे. मांजरडोंगरीच्या शिखरामागून हळूच डोकावणाऱ्या सूर्यनारायणाची सोनेरी किरणे जेव्हा गावाच्या वरच्या अंगाला असलेल्या तलावाच्या विस्तीर्ण जलाशयावर पडतात, तेव्हाचे मनोहारी दृश्य पाहणे मोठे आल्हाददायक वाटते. पश्चिमेस नागमोडी वळणे घेत खळाळणारी तेरेखोल नदी व तिच्या काठावर दिमाखात उभे असलेले माऊली देवीचे मंदिर आहे. वाऱ्याच्या तालावर हिंदोळणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा गावाचे सौंदर्य द्विगुणित करतात. अकरा वाड्यांच्या या गावाची कुटुंबसंख्या सुमारे ३५० आहे. बांद्याकडून असनिये व दाणोलीकडे जाणारा मार्ग याच गावातून जातो. गावात धार्मिक सलोख्याचे वातावरण असून मानकरी व ग्रामस्थ यांच्या एकजुटीने श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा भव्य ‘पंचकुंडी पुनःप्रतिष्ठापना सोहळा’ होत आहे.
कृषीप्रधान गाव अशी वाफोलीची ओळख आहे. लघुपाटबंधारे खात्याने बांधलेला तलाव गावासाठी वरदानच ठरला आहे. यामुळे संपूर्ण गाव सुजलाम् सुफलाम् झाला आहे. पावसाळ्यात भातपिकासह नाचणी, भुईमूग आदी पिके घेतली जातात. नारळी-पोफळी या बारमाही पिकांबरोबरच आंबा, काजू, कोकम, फणस ही हंगामी फळे विपुल प्रमाणात मिळतात. वाफोली-विलवडे येथील भाजीपाल्याला गोवा मार्केटमध्ये विशेष मागणी आहे.
शासनाच्या योजनांतही गाव अग्रभागी आहे. संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाले असून गावाला शासनाचा ‘महात्मा गांधी निर्मलग्राम पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. तंटामुक्त गाव समितीच्या पारदर्शक व उत्तम कामाची पोचपावती म्हणून गावाला दोन लाख रुपयांचा ‘तंटामुक्त ग्राम पुरस्कार’ मिळाला. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा असून, एक पूर्वप्राथमिक शाळा (पहिली ते सातवी) व पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे.
श्री माऊली हे वाफोली गावाचे ग्रामदैवत असून हे संस्थानकालीन मंदिर आहे. या मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. श्री देव लिंगेश्वर व वेतोबा या देवतांची मंदिरेही येथे आहेत. एकूण २२ एकर जमिनीवर येथे ‘देवराई’ पसरली आहे. श्री देवी माऊली येथे ‘महिषासुरमर्दिनी’ रूपात विराजमान आहे. महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मी यांचे एकत्रित रूप म्हणजे ‘माऊली’, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ‘माऊली’ अशी हाक मारल्यास ती एकाच वेळी तिन्ही देवतांपर्यंत पोहोचते, असे मानले जाते. गावचे देवस्थान ‘बारा-पाचांचे’ म्हणजेच बारा अंधार व पाच माया यांचे आहे. गवस पूर्वजांनी पूर्वीच्या गावडे-परब यांच्या निर्वंशीत राठीतील गावडे निर्वंशांच्या साहाय्याने जुन्या-नव्यांचा मेळ घालून, पाषाणाला माया जोडून गावरहाटीची जोडणी केली.
मांजरडोंगरीकर हा सीमेचा रक्षणकर्ता देव असून यावर भाविकांची असीम श्रद्धा आहे. रात्री उशीर झाल्याने एखाद्या वाटसरूने हाक दिल्यास हा देव मनुष्यरूपात सोबत करायचा, अशी आख्यायिका जुनी जाणती मंडळी सांगतात. ‘म्हातारीची कोंड’ हे स्थळही येथे प्रसिद्ध आहे. गावात विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर उत्साहात व भक्तीभावाने साजरे होतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा आध्यात्मिक वारसा लाभला आहे. येथील ‘बारा-पाच’ देवस्थाने हा लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. अनेक प्रथा-परंपरा, निसर्गाची जपणूक आणि आदर्श जीवनशैली यांची सांगड देवस्थानांशी घालून तळकोकणात पिढ्यानपिढ्या लोक सुखाने नांदत आले आहेत. गावाच्या सर्वोच्च श्रद्धा ग्रामदैवतांच्या मंदिराशी जोडलेल्या असतात. या श्रद्धेतूनच देवरायांचे संवर्धन, न्याय, नीती, धर्माचे आचरण, दुर्बल घटकांना संरक्षण आणि पशुपक्ष्यांच्या अधिवासाचे जतन अशा गोष्टी शेकडो वर्षे जपल्या गेल्या आहेत.
कोकण ही देवभूमी आहे. येथील धार्मिक अधिष्ठान लोकजीवनाशी घट्ट विणलेले आहे. जिल्ह्याची सुसंस्कृत ओळख याच तेजस्वी परंपरेतून घडली आहे. ग्रामदैवतेचे मंदिर हे समाज रचनेचे ऊर्जास्रोत असते. त्यामुळे गावात जन्मलेली व्यक्ती कितीही मोठी झाली किंवा सातासमुद्रापार गेली, तरी ती ग्रामदैवतेच्या भेटीला आणि उत्सवासाठी आवर्जून गावात येते.
कोकणात ग्रामदेवतेच्या मंदिराचे नियोजन आणि रचना गाव-व्यवस्थेसह नैतिकता सांगणारी असते. गाभाऱ्याकडे जाण्यासाठी तीन पायऱ्या असतात; या पायऱ्या न्याय, नीती आणि धर्म यांचे प्रतीक मानल्या जातात. गाभाऱ्यासमोर असलेल्या सभामंडपातील पहिल्या चार खांबांच्या आतील जागा ‘चौखांबा’ म्हणून ओळखली जाते. या जागेत बसून खोटे न बोलता न्याय व सत्य बोलणे बंधनकारक असते. गावाचे अनेक प्रमुख निर्णय याच जागेत घेतले जातात. याशिवाय सभामंडपापासून गाभाऱ्याची उंची, मुख्य दरवाजा, घंटा बांधण्याची जागा आणि मूर्तीचे स्थान यांची रचनाही अर्थपूर्ण असते. ग्रामस्थांच्या एकजुटीतून वाफोली ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार अत्यंत सुनियोजितपणे पार पडला आहे.
वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था, मुंबई या संस्थेचे गावच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. या संस्थेची स्थापना १९७६ मध्ये झाली. तत्पूर्वी १९७३ ते ७५ या काळात सभासद नोंदणी, घटना निर्मिती, पद्धतशीर रेकॉर्ड व लेखापरीक्षण करण्यात आले होते. मुंबईकर चाकरमान्यांची ही संस्था आणि गाव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असले तरी चाकरमान्यांची नाळ गावाशी कायम जोडलेली असते. संस्थेच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करणे हा उद्देश ठेवून आजवर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
(पुरवणी संकलन: नीलेश मोरजकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.