

swt2320.jpg
39187
सिंधुदुर्गनगरी ः आरोग्य समितीच्या सभेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थांचा सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
‘दुर्धर’ योजनेच्या नव्या अटींना विरोध
आरोग्य समिती सभाः उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ः संस्थात्मक प्रसूती उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थांचा आरोग्य समितीच्या सभेत सन्मान करण्यात आला. दुर्धर आजारग्रस्तांना आर्थिक मदत योजनेतील नव्या अटींचा प्रस्ताव सदस्यांनी फेटाळून लावत जुने निकष कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरोग्य समिती सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, संतोष पारकर, सावी लोके, अवनी तेली, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, सुनील पारकर आदी उपस्थित होते.
संस्थात्मक प्रसूती उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी आशिष मोहोड यांनी देवगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल येथे सर्वाधिक १३ प्रसुत्या करत प्रथम क्रमांक मिळवून दिला. द्वितीय क्रमांक मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राने, तर तृतीय क्रमांक खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकाविला.
दरम्यान, दुर्धर आजाराने पीडित रुग्णांना आर्थिक मदत देण्याच्या योजनेसाठी नव्याने अटी लागू करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सभेसमोर मांडला होता; मात्र, या अटी लागू झाल्यास प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता व्यक्त करत सदस्यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे या योजनेत पूर्वीप्रमाणेच निकष कायम राहणार आहेत.
आरोग्य संस्थांची वीज बिले पूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत भरण्यात येत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा निधी मिळत नसल्याने संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्याबाबत ठराव सादर करावा, अशा सूचना सभापती राऊळ यांनी दिल्या.
..................
चौकट
आरोग्य केंद्र इमारतींचा सर्व्हे करण्याचे निर्देश
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि येथील निवासी इमारतींचा तत्काळ सर्व्हे करून त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करावा, अशा सूचना सभापती राऊळ यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांतील दूरध्वनी सेवा कार्यरत नसल्याने संपर्क साधताना अडचणी येत असल्याचा मुद्दा सदस्यांनी सभेत उपस्थित केला. यावेळी दूरध्वनी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र, सभापतींनी प्रत्यक्ष पडताळणीसाठी कोणत्याही केंद्राला फोन लावण्यास सांगितले असता एकाही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला संपर्क साधता आला नाही. यावर संताप व्यक्त करत
सभापती राऊळ यांनी सर्व आरोग्य केंद्रांचे दूरध्वनी तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.
..................
चौकट
हत्तीरोग, माकडताप रुग्णांत लक्षणीय वाढ
जिल्हा हिवताप विभागामार्फत आजच्या सभेत दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०२५ मध्ये एकूण १८ हत्तीरोग रुग्ण आढळले होते, तर २०२६ मध्ये आतापर्यंत ११५ रुग्ण आढळले आहे. त्यामध्ये हत्ती पायाचे ५८ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. २०२५ मध्ये जिल्ह्यात माकड तापाचे ४ रुग्ण आढळले होते. यावर्षी आतापर्यंत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत ५ रुग्ण आढळले असल्याची माहिती आजच्या सभेत देण्यात आली. या व्यतिरिक्त हिवतापाचे २५ आणि डेंगीचा १ रुग्ण आढळला असल्याचे सांगण्यात आले. याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना सभापती राऊळ यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.