

पाक-पोषण .........लोगो
(११ एप्रिल टुडे १०२)
हवामान बदलाला
तोंड देण्यासाठी रानमेवा
करवंद, जांभूळ, आंबा, काजू गर, चिंचा, बोरे, कमरक, ताडगोळे, फणस, राय आवळा, जांब, अळू, तुती हे शब्द कानावर पडले तरी तोंडाला पाणी सुटते आणि डोळे मिचकावल्याशिवाय आपण याबद्दल काहीही बोलू शकत नाही. नेमक्या आपल्या परीक्षा आणि या फळांची झाडावर यायची एकवेळ होते आणि आई ओरडते, ‘परीक्षा झाल्या की खा, आता खोकला-ताप काही नकोय.’ मग सुट्या लागायची वाट पहायची आणि नंतर रानातल्या या सर्व फळांचा फडशा पाडायला पळायचे. आमचे लहानपण तर असेच गेले. काही प्रमाणात गावाकडच्या मुलांना हा आनंद मिळत असेलही, मात्र शहरातील मुलांना ही फळे तेवढीशी चाखायला मिळत नाहीत. काही शाळांच्या बाहेर ही फळे विकणाऱ्या गाड्या येतात खऱ्या पण स्वच्छतेचे निकष लावून ही फळे खावी, असे काही पालकांना वाटत नाही आणि मुलांना तर त्यांची नीट ओळखच नसते. त्यामुळे चायनीज भेळ आणि मंचुरियनच्या गाडीवर ज्या ओढीने ही मुले जातात तेवढ्या ओढीने या फळांकडे वळत नाहीत...!
- rat२४p६.jpg-
26O39343
- संगीता खरात,
सहसंचालिका, सृष्टीज्ञान संस्था
----
खरेतर, उन्हाळ्याच्या झळा आणि त्यामुळे होणारे विविध आजार दूर ठेवण्यासाठी ही फळे उपयुक्त आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे वाढणारे तापमान सुसह्य करण्यासाठीच ही स्थानिक फळे नेमका मोसम साधून येत असतात. हवामान बदलासारख्या समस्येला तोंड द्यायचे असेल, तर स्थानिक अन्नधान्य आणि भाज्यांबरोबरच या रानमेव्याचे आपल्या आहारात महत्त्वाचे स्थान आहे.
आता बाजारात सर्व मोसमात सर्व फळे उपलब्ध असतात. मात्र, या फळांमध्ये पोषणमूल्ये, नैसर्गिक साखर, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्त्वे किती मिळतील, याबाबत शंकाच आहे. रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी आजकाल छोट्या तालुक्यांच्या बाजारातही ड्रॅगनफ्रूट आणि किवीसारखी परदेशी फळे दिसू लागली आहेत आणि ही रासायनिक पद्धतीने पिकवलेली महागडी फळे आपण विकत घेऊन खातोय. असे आहे तरी काय या फळांत? या ताज्या फळांच्या सेवनामुळे आपल्याला भरपूर पाणी, ‘क’ जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. पाणी आपल्याला तजेला देते, अँटीऑक्सिडंट्स शरीराची झालेली झीज भरून काढतात आणि ही प्रक्रिया व्हायला ‘क’ जीवनसत्त्व मदत करते. पण ही फळे आपल्याला ताजी खायला मिळत नाहीत. शेतकऱ्याने किमान चार दिवस आधी काढलेली ही फळे घाऊक बाजारातून किरकोळ बाजारात असा प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतात. अनेकदा ही फळे लवकर पिकावीत किंवा त्यांना चांगला रंग यावा म्हणून विविध रसायने फवारली जातात. अशा वेळी या फळांच्या सेवनामुळे आपल्याला नक्की कोणती पोषकद्रव्ये मिळत असतील, याचा विचार आवर्जून झाला पाहिजे.
रानमेवा हा रानात कोणत्याही रासायनिक खताशिवाय किंवा कीटकनाशकाशिवाय नैसर्गिकरीत्या उगवलेला असतो. या सर्व फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व, नैसर्गिक साखर, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ही फळे तुमची तहान भागवू शकतात, उन्हाची काहिली कमी करू शकतात. तुमच्या पोटातील पित्त शांत करून उन्हाळ्यातील आजार कमी करू शकतात. रानमेवा हा जंगलात आणि डोंगरकड्यांमध्ये पायपीट करून आदिवासी बांधव पळसाच्या पानांच्या द्रोणांतून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. ही वनोपजे आदिवासींना थोडी आर्थिक मदत मिळवून देतात. परंतु, मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड आणि वनस्पतींची होणारी एकसुरी लागवड (Monoculture) यामुळे हा रानमेवा कमी होत चालला आहे. तोरणे, औंट यांसारखी काही फळे तर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हाच रानमेवा जंगलातील प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षित करत असतो. आजकाल शेतीमध्ये माकडांचा उपद्रव फार वाढला आहे, कारण जंगलात त्यांच्यासाठी पुरेसे अन्न नाही. अशा वेळी त्यांना रानमेवा उपलब्ध झाला, तर ते शेतावर धाड घालणार नाहीत. रानमेव्यातील वैविध्य हे आपल्याला अभिमान असलेल्या भारताच्या जैवविविधतेमध्ये लक्षणीय आहे. अशा रानमेव्याला आपण नीट समजून घेऊन त्यांना आपल्या आहारात योग्य स्थान दिले पाहिजे. त्याचबरोबर या वनस्पतींच्या अधिवासांचे संरक्षण करून रानमेव्याच्या वनस्पतींचे संवर्धन करणेही काळाची गरज आहे.
(लेखिका भारतीय पारंपरिक आहार संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.