लोखंडी सळई वाहतूक कंटेनरचा अपघात

लोखंडी सळई वाहतूक कंटेनरचा अपघात
Published on

लोखंडी सळई वाहतूक कंटेनरचा अपघात
भिवंडी : भिवंडी-वाडा रस्त्यावर शुक्रवारी (ता. २४) सकाळी अनगाव गावामध्ये लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. अवजड माल वाहून नेताना कंटेनरचा पाटा तुटून चालकाची कॅबिन वेगळी झाली. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. भिवंडी-वाडा रस्त्याचे काँक्रीटीकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्त असल्याने मागील काही वर्षांपासून अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या अपघातामुळे कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने या रस्त्यावर दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्यावर एका बाजूने काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खड्डेही पडलेले असल्याने या रस्त्यावर कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
.........
व्हायरल व्हिडीओनंतर चालकाविरुद्ध गुन्हा
ठाणे : मुंब्रा-कौसा परिसरात चार जणांनी एका दुचाकीवर बसून भरधाव व बेदरकारपणे दुचाकी चालवत केलेली स्टंटबाजी एका व्हायरल व्हिडिओमुळे वाहनचालक आणि मालकाच्या चांगलीच अंगाशी आली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करीत संबंधित दुकलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई संदीप शंकर शेंडगे (३०) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी (ता. २०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कौसा परिसरात खर्डी रोड ते वाय जंक्शनदरम्यान पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळी तन्वरनगर नाका येथे चार जण एकाच मोटारसायकलवरून भरधाव, धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत, अशी एका जागरूक नागरिकाने माहिती दिली. त्यानुसार तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. सुरुवातीला संबंधित वाहन सापडले नाही; मात्र समाजमाध्यमावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार माहितीच्या आधारे बीट पथकाने दर्गा रोड परिसरात शोध घेऊन तीन जणांना ताब्यात घेतले.
............
९१९ बालिका लैंगिक शिकारीच्या बळी
ठाणे शहर : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने पालकांममध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दोन्ही जिल्ह्यांत महिलांपेक्षा लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या अल्पवयींन मुलींची संख्या तिपटीहून जास्त असल्याने मुलींसाठी धोकादायक ठरत आहेत. मुलींबाबत पोलिस दफ्तरी असलेली ही नोंद धक्कादायक असून शासकीय स्तरावर गांभीर्याने उपाययोजना करणारी ठरली आहे. या जिल्ह्यांत तीन वर्षांत १,२०० महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या असून त्यात पीडित मुलींची संख्या ९१९ आहे.
.......
मुंब्रा,दिवा परिसरातून पाच मुली बेपत्ता
ठाणे : मुंब्रा व दिवा परिसरातून एक-दोन, नाहीतर तब्बल पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहे. सर्व प्रकरणांमध्ये पालकांनी अनोळखी व्यक्तींवर अपहरणाचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ तासात नोंदवल्या या घटनांमुळे त्या-त्या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिलला सायंकाळी मुंब्रा येथील १७ वर्षीय मुलगी मावशीच्या घरी जाऊन कपडे घेऊन येते, असे सांगून घरातून निघून गेली; मात्र ती परत आली नाही. त्यानंतर २१ एप्रिलला दुपारी १४ वर्षीय मुलगी ही शाळेची परीक्षा देऊन घरी आल्यानंतर पुन्हा बाहेर पडली आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. तर, २२ एप्रिलला सकाळी दिवा पूर्व येथील १७ वर्षीय मुलगी ही घरातून निघून गेली असून, तिचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याच दिवशी सकाळी साडेआठ वाजता दिवा येथील १३ वर्षीय मुलगीही कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मुंब्रा येथील १६ वर्षीय मुलगी ही, मैत्रीणीसोबत ठाण्याला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली; मात्र तीही परतलेली नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे.
........
सरनाईक स्पर्धेत ‘बिट्टू बॉस’ चे आकर्षण
ठाणे : मिरा-भाईंदर परिसरात सध्या सुरू असलेल्या प्रताप सरनाईक प्रीमियर लीग या टेनिस क्रिकेट स्पर्धेत ‘बिट्टू बॉस’ हे एक वेगळेच आकर्षण पाहायला मिळत आहे. येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लाडक्या बिबट्याच्या स्मृतिप्रित्यर्थ तयार करण्यात आलेले हे शुभंकर (मॅस्कॉट) सध्या स्पर्धेचे प्रमोशन करताना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रच्या जंगलात सापडलेल्या या पोरक्या बछड्याला मंत्री प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतले होते. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या ‘बिट्टू’ या टोपणनावावरून त्याचे ‘बिट्टू बॉस’ असे नामकरण झाले होते. गेल्या महिन्यात २१ मार्चला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बिट्टू बॉस’ या सहावर्षीय बिबट्याचे आजारपणाने निधन झाले. बिट्टूच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. त्याची आठवण अशीच पुसली जाऊ नये आणि लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करीत वाढलेल्या या ‘फायटर’ची ऊर्जा सर्वांना मिळावी, या उद्देशाने आयोजकांनी पीएसपीएलच्या निमित्ताने त्याला ‘शुभंकर’ म्हणून पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com