

दादर-रत्नागिरी रेल्वेचा प्रश्न अद्याप प्रलंबितच
रेल्वेच्या धोरणावरून नाराजी ; खासदारांचा आवाज कमी पडतोय
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २६ ः राज्यातील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना, मध्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, कोकणातील प्रवाशांनी सातत्याने मागणी करूनही ‘दादर-रत्नागिरी’ गाडीचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासदारांचा आवाज दिल्लीत कमी पडत आहे का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
उन्हाळी सुट्टीमुळे सीएसएमटी, एलटीटी, दादर आणि पनवेल स्थानकांवरून देशाच्या विविध भागांत विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या विलंबाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वेळापत्रक कोलमडल्याने कनेक्टिंग गाड्या चुकणे आणि प्रवासाचे नियोजन बिघडणे, यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रेल्वेने ‘दिवा-सीएसएमटी-दिवा’ ही साप्ताहिक विशेष गाडी नियमित केली आहे. आता ही गाडी दिवा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-दिवा या नवीन नावाने २४ डब्यांसह धावणार आहे. कोल्हापूर-मुंबई, भुसावळ-मुंबई, नांदेड-एलटीटी, पुणे-पनवेल आणि अजनी-एलटीटी यांसारख्या राज्यांतर्गत धावणाऱ्या किमान ३० एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या आहेत. "मध्य रेल्वे राज्यातील गाड्यांना मुंबईत प्रवेश नाकारून परराज्यातील गाड्यांना पायघड्या घालत आहे. या अन्यायाविरोधात रविवारी दादर येथे ''महाराष्ट्र रेल्वे परिषद'' आयोजित केली आहे," असे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी सांगितले.
चौकट
कोकणवासीयांची प्रतीक्षा कायम
लोकल गाड्यांना अडथळा ठरत असल्याचे कारण सांगून ‘दादर-रत्नागिरी’ गाडी रद्द करून ती ‘दिवा-रत्नागिरी’ अशी करण्यात आली. मात्र, त्याच वेळी ‘दादर-गोरखपूर’ला परवानगी कशी मिळते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात गाडी सुरू होण्याबाबत अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.