

39743
स्वतःमधील सर्जनशीलता
जिवंत ठेवा ः पवार
सिंधुदुर्गनगरी येथे ‘रंग-संवाद’
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः प्रत्येकात एक लहान मुल दडलेले असते. नवीन काही शिकायचे असेल तर स्वत:च्या आतले हे मुल जागे ठेवा. कारण लहान मुल हे सतत प्रश्न विचारणारे, कुतुहल जिवंत असलेले आणि सर्जनशील असते, असे प्रतिपादन रंगकर्मी, अभिनेता, निवेदक नीलेश पवार यांनी येथे केले.
‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ‘रंग-संवाद’ या चौदाव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. पवार यांनी एक तासाहून अधिक काळ रसिकांशी थेट संवाद साधत नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि सादरीकरण यावर अनेक बारकाव्यांसह भाष्य केले. या उपक्रमाचे समन्वयक सतीश लळीत यांनी श्री. पवार यांचा शाल, गुलाबपुष्प आणि ग्रंथभेट देऊन सत्कार केला. पुरुषोत्तम कदम यांनी श्री. पवार यांचा परिचय केला. लेखन आणि अभिनयाबरोबर निवेदन, सूत्रसंचालन, डबिंग, समालोचन, मुलाखतींचे संचालन अशा अनेक क्षेत्रात श्री. पवार यांनी केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला.
श्री. पवार यांनी नाटकाच्या लेखनापासून ते रंगमंचावर सादर होईपर्यंतच्या सर्व टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्मितीमध्ये सहभागी असलेले सर्व घटक आणि रसिक यांचा परस्परसंबंध उलगडून सांगितला. ते म्हणाले, ‘‘रसिक हा सुद्धा उत्कृष्ट कलाकार असतो. रसिकाशिवाय कलाकार अपूर्ण असतो. रंगमंचावरील प्रसंग, संवाद, नेपथ्य आणि अभिनय यातून निर्माण होणारी रसनिर्मिती हा सामूहिक अनुभव असतो. रंगमंचावर सादर होणारे नाटक आहे, ते खोटे आहे, हे कलाकार आणि रसिक या दोघांनाही माहिती असते. पण खरे वाटावे, असे हे खोटे असते. हीच नाटकाची गंमत आहे. म्हणूनच नाटकाला ‘समूहकला’ म्हटले जाते.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘करमणूक किंवा मनोरंजन हा नाटकाचा केवळ एक उद्देश आहे. नाटकाने प्रेक्षकाला विचारप्रवृत्त केले पाहिजे, समाजभान दिले पाहिजे. नाट्यकला ही विचारांची आंघोळ आहे. किमान प्रायोगिक नाटकातून तरी हा उद्देश पूर्ण झाला पाहिजे. अलीकडच्या अनेक प्रायोगिक नाटकातून तो पूर्ण होताना दिसतो. प्रायोगिक नाटकातील संकेत, सुचकता प्रेक्षकांनीही समजून घेतली पाहिजे.’’ सतीश लळीत यांनी मराठी रंगभूमीचा थोडक्यात आढावा घेतला. कलाकार आणि रसिक यांनी एकमेकांना समजून घ्यावे, नाटक पहाण्याचा अनुभव समृद्ध कसा करता येईल, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सागितले. कवयित्री डॉ. सई लळीत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.