दोडामार्ग स्कूलमध्ये सूर्यनमस्कार शिबिर

दोडामार्ग स्कूलमध्ये
सूर्यनमस्कार शिबिर
Published on

दोडामार्ग स्कूलमध्ये
सूर्यनमस्कार शिबिर
दोडामार्ग : दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आयोजित केलेले १५ दिवसीय सूर्यनमस्कार शिबिर नुकतेच उत्साहात झाले. या शिबिरात योग मार्गदर्शिका आराध्या अमर प्रभू यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. योगा शिक्षणक्रमाच्या क्षेत्रीय प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. आजच्या धावपळीच्या युगात आणि वाढत्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची एकाग्रता वाढावी आणि त्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने विद्यालयात या विशेष शिबिराचे आयोजन केले होते.
-------
वाहनाच्या धडकेत
आंबोलीत गवा ठार
आंबोली : आजरा-आंबोली मुख्य रस्त्यावर आंबोली-नांगरतास येथे एका गव्याला वाहनाने धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गव्यांचा कळप रस्ता ओलांडत होता. त्यातील मागे असणाऱ्या एका गव्याला वाहनाची धडक बसली. ओंकार गावडे यांच्या घरानजीक ही घटना घडली. याबाबत वनविभागाला कळवण्यात आले.
-------------
शिरोड्यात मेमध्ये
रक्तदान शिबिर
आरवली : शिरोडा परबवाडा येथील रामपुरुष युवा मित्रमंडळातर्फे २ मे रोजी उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी गोवा मेडिकल कॉलेजची ब्लड बँक रक्त संकलनासाठी उपस्थित राहणार आहे. रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, ही जाणीव ठेवून पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन रामपुरुष युवा मित्रमंडळ, शिरोडा-परबवाडा यांनी केले आहे.
----------
सातार्डा रवळनाथ
वर्धापन दिन उद्या
सातार्डा : सातार्डा ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा २८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता लघुरुद्र व पूजा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. रात्री ९.३० वाजता श्री देव रवळनाथ नाट्य मंडळाचा रणजीत देसाई, वसंत कानेटकर लिखित तसेच गणेश ठाकूर दिग्दर्शित ''गरुडझेप'' हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे.
--------
वेंगुर्ले सांब सदाशिव
देवता वर्धापन दिन
वेंगुर्ले : कॅम्प-भटवाडी येथील श्री विश्वेश्वर सांब सदाशिव देवतेचा वर्धापनदिन २७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, रूद्रयाग, बलिदान, पूर्णाहुती, श्री वरदशंकर पूजा, महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता गोवर्धन मंडळाचे भजन, रात्री ८.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ''वृंदा जालंधर'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.
--------
पेडणे-खाजने माउली
मंदिरात वर्धापन दिन
सातार्डा : पेडणे-खाजने येथील श्री देवी माउलीचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा २९ एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देवी माउली मंदिरमध्ये होणार आहेत. बुधवारी सकाळी धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद होणार आहे. त्यानंतर शिवदास पडणेकर यांचा ‘कराओके’ हा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वा. शिवदास पडणेकर पुरस्कृत ‘आंधळ्याची काठी’ हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खाजने ग्रामस्थांनी केले आहे.
----
कांदळगाव येथे
रंगतदार नाटक
मालवण : कांदळगाव ग्रामस्थांच्यावतीने २९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भव्य दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांच्यावतीने ‘उघडले स्वर्गाचे दार’ हा रंगतदार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. हा नाट्यप्रयोग कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरासमोर आयोजित केला असून परिसरातील सर्व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com