

मालवण-देऊळवाडा रस्त्यावर
वाहतूक पोलिस नियुक्त करा
राहुल परब यांची प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : मालवण-कसाल या मुख्य राज्यमार्गावरील देऊळवाडा महापुरुष मंदिर येथील अरुंद वळणावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेता, या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस किंवा होमगार्डची नियुक्ती करावी, अशी मागणी कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल परब यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे लक्ष वेधले.
देऊळवाडा महापुरुष मंदिर येथील हे वळण मालवण-कसाल मार्गावरील सर्वांत छोटे आणि धोकादायक वळण मानले जाते. या ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. परिणामी, येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांना कसरत करावी लागते. यापूर्वी येथे अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून, भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुंभारमाठ पंचक्रोशीसह तालुक्यातील बहुतांश नागरिक याच मार्गावरून ये-जा करतात. शहरात प्रवेश करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. या अरुंद वळणावर वाहने अडकून पडल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातोच, शिवाय पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना म्हणून संबंधित वळणावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन तत्काळ या ठिकाणी वाहतूक पोलिस किंवा होमगार्ड उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील, असे श्री. परब यांनी पत्रकात म्हटले आहे.