

39811
इन्सुलीतील ‘तो’ कठडा ‘जैसे थे’
अपघाताची टांगती तलवार; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-सावंतटेंब येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात महामार्गाचा संरक्षक कठडा तुटला होता. महिनाभर उलटूनही या ठिकाणी नवीन कठडा बांधण्याबाबत महामार्ग विभागाने कोणतीही पावले उचलली नाहीत. या ठिकाणी रस्ता अरुंद असून, खाली खोल ओहोळ असल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी दिला आहे.
सावंतटेंब येथे एका मोटारीच्या धडकेत महामार्गाच्या कडेला असलेला संरक्षक कठडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. हा भाग भौगोलिकदृष्ट्या धोकादायक आहे. महामार्ग या ठिकाणी बराच अरुंद असून, रस्त्याच्या बाजूलाच मोठा ओहोळ आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळी वातावरणात वाहनचालकांना या संरक्षक कठड्याअभावी रस्त्याचा अंदाज येणे कठीण झाले आहे. एखादे वाहन थोडे जरी बाजूला गेले, तर थेट ओहोळात कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे श्री. नाटेकर यांनी महिनाभरापूर्वी महामार्ग विभागाचे लक्ष वेधले होते. लवकरात लवकर येथे संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप केवळ आश्वासनच मिळाले असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाच्या या ‘‘जैसे थे’’ भूमिकेमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता महामार्ग विभाग या इशाऱ्याची दखल घेऊन अपघात होण्याची वाट पाहणार की, तत्काळ कामाला सुरुवात करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----
कोट
येथील परिस्थिती अत्यंत धोकादायक असून, प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. आम्ही वारंवार सूचना देऊनही महामार्ग विभाग गाढ झोपेत आहे का? असा प्रश्न पडतो. जर येत्या काही दिवसांत या ठिकाणी संरक्षक कठड्याचे काम सुरू झाले नाही, तर आम्हाला जनहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
- स्वागत नाटेकर, ग्रामपंचायत सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.