गावागावात जपली जातेय जागरण-गोंधळाची परंपरा

गावागावात जपली जातेय जागरण-गोंधळाची परंपरा
Published on

rat26p13.jpg-
39820
जागरण-गोंधळ साठी केलेली तयारी.

गावागावात जपताहेत जागरण - गोंधळाची परंपरा
लग्नसराईत वाघ्या-मुरळीला मागणी; मानधनातही झाली वाढ
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः हिंदू धर्मात विवाह समारंभ निर्विघ्नपणे पार पडावेत, यासाठी देवाला साकडे घालण्याची प्राचीन परंपरा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुलधर्म आणि कुलाचारासाठी ‘जागरण-गोंधळ’ घालण्याची प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात असल्याने घराघरांतून कुलदैवत खंडोबाच्या जागरणाचे आणि कुलदेवता तुळजाभवानीच्या गोंधळाचे स्वर घुमू लागले आहेत.
घरातील मुला-मुलीचे लग्न जमले किंवा देव्हाऱ्यातील देव जेजुरीला खंडोबाच्या भेटीला नेऊन आणले की, कुलाचार म्हणून जागरण-गोंधळ घातला जातो. पूर्वी या कार्यासाठी थेट जेजुरीहून वाघ्या-मुरळी येत असत. या विधीमध्ये खंडोबाची तळी भरणे, कोटम भरणे, घटस्थापना आणि पहाटेच्या वेळी लोखंडी कडी असलेले साखळीचे ‘लंगर तोडणे’ यांसारखे महत्त्वाचे विधी केले जातात. लंगर तोडणे म्हणजे डोक्यावरील जबाबदारीचे ओझे उतरविणे, अशी यामागील धारणा आहे. लग्नाकार्यामुळे सध्या वाघ्या-मुरळी आणि गोंधळींना मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने त्यांचे मानधनही वाढले आहे. ही परंपरा केवळ करमणूक नसून श्रद्धेचा भाग असल्याने यजमानही या सादरीकरणात तल्लीन होऊन जातात.

चौकट
अशी आहे ही परंपरा
रात्री दहाच्या सुमारास जागरणाला सुरुवात होते. ''कैलास राणा शिवचंद्र मौळी'' या शंकरस्तुतीने कार्यक्रमाचा प्रारंभ होतो. यामध्ये गण-गौळण, मल्हारी कथन आणि खंडोबा-म्हाळसा-बाणाई यांच्या जीवनावरील नाट्यरूपी कथा सादर केल्या जातात. खंडोबाने दैत्यांचा केलेला संहार, देवाचे लग्न आणि विरह प्रसंग वाघ्या-मुरळी आपल्या गायन व नृत्यातून उभा करतात. यासोबतच नल-दमयंती, सत्यवान-सावित्री यांसारख्या पौराणिक कथांचेही सादरीकरण केले जाते.

कोट १
जागरण-गोंधळ ही महाराष्ट्राची समृद्ध लोककला आहे. काळानुसार तिचे स्वरूप बदलले असले तरी त्यामागची भावना आजही मूळ आहे. आपली संस्कृती पिढ्यान्‌पिढ्या समृद्ध राहण्यासाठी या लोककलावंतांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
- रवींद्र यादव, अभ्यासक

कोट २
लग्नसराईचा हा हंगाम आमच्यासाठी उपजीविकेचे मुख्य साधन असतो. श्रद्धेपोटी जागरण-गोंधळ घालणारे आणि कलेसाठी रात्रभर घाम गाळणारे लोककलावंत आता मोजकेच राहिले आहेत, तरीही आम्ही ही परंपरा टिकवून आहोत.
- सुरेश तावडे, गोंधळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com