

फिजिओ संवाद ..........लोगो
(१५ एप्रिल टुडे ३)
‘एमआरए’ नॉर्मल
तरी वेदना होतेय
वेदना समजून घेताना नुसतेच रिपोर्टवर अवलंबून न राहता पूर्ण शरीराकडे एक संस्था म्हणून बघून विचार केला पाहिजे. संस्थेच्या कुठल्याही घटकात झालेला बिघाड पूर्ण संस्थेला दुखणे देऊ शकतो. त्यामुळे उपाय करताना केवळ दुखणाऱ्या भागाचा विचार न करता पूर्ण शरीराचा आणि जीवनशैलीचा विचार करणे उपयुक्त ठरेल. लक्षात ठेवा, एमआरआय किंवा एक्स-रे शरीरातील रचना दाखवू शकतो; पण त्या रचनांची ताकद, काम करण्याची कुवत, त्या रचनांमधील ताणतणाव या गोष्टी नाही दाखवू शकत. वेदना ही शरीर आणि मन या दोन्हींची समस्या असते. त्यामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.
- rat२८p१.jpg-
26O40126
- डॉ. पुष्कराज चांदोरकर
(PT) B.P.Th.
-----
‘डॉक्टर, रिपोर्ट नॉर्मल आहे तरी पण दुखणं थांबतच नाहीये,’ ही तक्रार हल्ली खूप सामान्य झाली आहे. अनेक रुग्ण एक्स-रे, MRI, सिटीस्कॅन अशा अनेक प्रकारच्या तपासण्या करून येतात. रिपोर्टमध्ये विशेष काही दिसत नाही. तरीदेखील वेदना मात्र कायम असते. मग प्रश्न पडतो की, जर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे तर दुखणे येतेय तरी कुठून? याचे उत्तर शोधणे आणि त्यामागची कारणं समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. ‘वेदना’ ही कायम शरीराच्या रचनेत झालेल्या बदलामुळेच येते असं नाही. MRI किंवा एक्स-रेमध्ये आपल्याला हाडे, डिस्क, सांधे, स्नायू यांची फक्त रचना दिसते. त्यांच्या रचनेत बिघाड झालेला असेल तर तो आपण या रिपोर्टमधून बघू शकतो; पण स्नायूंची कार्यक्षमता, शरीराचा समतोल, हालचालींची पद्धत, ताणतणाव यासारख्या गोष्टी एमआरआय मध्ये दिसत नाहीत.
अनेकदा लोकांना एमआरआय करा म्हटल्यावरच भीती वाटायला लागते. एमआरआय केला म्हणजे काहीतरी बिघडलं आहे. आता सर्जरी करावी लागणार, काहीतरी खूप मोठी समस्या आहे, अशा अनेक शंका आणि त्याची भीती सतत डोक्यात घर करते. ही भीतीच वेदना वाढवण्यात मुख्य वाटा उचलते. त्यामुळे रिपोर्ट समजून घेणे आणि त्याचा योग्य अर्थ लावणे, हे देखील गरजेचे आहे. आजकाल इंटरनेटच्या वापरामुळे सेल्फडायग्नोसिस हा प्रकार खूप प्रमाणात वाढला आहे. म्हणजेच ‘एमआरआय’चे रिपोर्ट बघून इंटरनेटवर वाचून त्यावर स्वतःच निदान करणे, त्या दुखण्यावर स्वतःच youtube वर शोधून उपाय करणे. यामुळे योग्य निदान आणि उपचार होण्यासाठी विलंब केला जातो. त्यामुळे वेदना आणखी बळावते.
खूपवेळा समस्या ही functional असते. म्हणजेच शरीराची रचना व्यवस्थित असली तरी त्याच्या काम करण्याच्या पद्धतीत बिघाड झालेला असतो. चुकीची बसण्याची पद्धत, सतत एकाच पोझिशनमध्ये बसणे, कमी हालचाल, स्नायूंची कमजोरी किंवा असंतुलन या सगळ्या गोष्टींमुळे वेदना निर्माण होत असतात; पण या गोष्टी कोणत्याही प्रकारच्या स्कॅनमध्ये दिसू शकत नाहीत तसेच आपल्या शरीरातील मज्जासंस्था म्हणजे नर्व्हस सिस्टम (nervous system) वेदना जाणवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. काही वेळा स्नायू आणि सांध्यांमध्ये मोठा प्रॉब्लेम नसतानासुद्धा सततच्या ताणामुळे किंवा भीती, चिंता यासारख्या गोष्टींमुळे वेदना तीव्रतेने जाणवू लागतात. मानसिक ताणतणाव, चिंता, झोपेचा अभाव आणि सतत अतिउत्तेजन यांचाही वेदनेवर मोठा परिणाम होतो. मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे मनाची अस्वस्थता शरीरात वेदनेच्या स्वरूपात दिसू शकते.
फिजिओथेरपीच्यादृष्टीने पाहिलं तर अशा वेदना ज्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल असतात तिथे शरीराची हालचाल, स्नायूंची ताकद, समतोल आणि श्वसन यावर काम केलं तर वेदनेत फार फरक पडू शकतो. योग्य व्यायाम, जीवनशैलीतील सुधारणा, रिलॅक्सेशन तंत्रे यामुळे वेदना कमी होऊ शकतात. रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी वेदना होत असेल तर हे दुखणे अंगावर काढणे, आपोआप बरे होईल म्हणून वाट बघणे, स्वतःच ठरवून गोळ्या घेणे, सोशल मीडियावर बघून व्यायाम करणे या चुका रुग्णांनी टाळल्या पाहिजेत.
(लेखक लांजा येथे अनादि फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात.)
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.