

रत्नागिरी-काळबादेवी बसफेऱ्या बंद
ग्रामस्थांना त्रास; १ मेपासून उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः रत्नागिरी आगारातून सुटणाऱ्या रत्नागिरी-काळबादेवी मार्गावरील महत्त्वाच्या शहरी बसफेऱ्या गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद केल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, बससेवा पूर्ववत न झाल्यास महाराष्ट्र दिनी १ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा शिवसेना शाखाप्रमुख संदेश बनप यांनी दिला आहे.
काळबादेवी परिसरात सुमारे १२ वाड्या असून, २ हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. येथील विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिक दैनंदिन कामासाठी एसटी बसवर अवलंबून आहेत; मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सकाळी १०:२५ आणि दुपारी १:२५ ची बससेवा बंद आहे तसेच गेल्या ३-४ महिन्यांपासून सकाळी ८:०५ ची महत्त्वाची फेरीदेखील बंद असल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सध्या जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, बस वेळेत नसल्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. स्वतःचे वाहन नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत असून, जादा पैसे मोजावे लागत आहेत. याचा फटका काळबादेवीसह शिरगाव, आडी, कासारवेली आणि बसणी भागातील प्रवाशांनाही बसत आहे.
याबाबत संदेश बनप यांनी शहर बसस्थानक प्रमुखांना लेखी निवेदन दिले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. निवेदन दिल्यानंतर पुढील ४ दिवसांत बससेवा सुरू न झाल्यास १ मे पासून उपोषणाला बसण्याचा निर्धार बनप यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.