

swt610.jpg
41798 P
श्रीकृष्ण सावंत
माजगावात महसुली कामे रखडली
तलाठ्याअभावी गैरसोय ः तीव्र आंदोलनाचा सावंत यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः तालुक्यातील महत्त्वाचे आणि मोठे महसुली गाव म्हणून ओळख असलेल्या माजगाव येथील तलाठी कार्यालय गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी कारभाराच्या विळख्यात अडकले आहे. कायमस्वरुपी तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, या अन्यायाविरोधात आता माजगाववासीय आक्रमक झाले आहेत. येत्या ८ दिवसांत कायमस्वरुपी तलाठी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे.
माजगाव हे गाव महसूल उत्पन्नाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी पूर्णवेळ तलाठी उपलब्ध नाही. सध्या अन्य ठिकाणच्या तलाठ्यांकडे या गावाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रभारी तलाठी ठराविक वेळेत उपलब्ध होत नसल्याने सातबारा उतारे, वारस नोंद, फेरफार आणि विविध शासकीय दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना स्वखर्चाने येथील तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मजुरी सोडून आणि पैसे खर्च करूनही कामे वेळेवर होत नसल्याने प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, सामान्य शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत असताना दुसरीकडे जमिनींच्या खरेदीखतांचे व्यवहार मात्र जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. माजगाव तलाठी कार्यालयातील सावळागोंधळ इतक्यावरच थांबत नसून या गावासाठी नियुक्त असलेले कोतवाल हे गावात राहण्याऐवजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कार्यालयात साधी चौकशी करण्यासाठीही कोणाचे पाठबळ उरलेले नाही. गावचा महसूल कर्मचारीच गावात नसेल, तर सामान्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे जोपर्यंत कायमस्वरुपी तलाठी मिळत नाही, तोपर्यंत तलाठी कार्यालय उघडू देणार नाही. लोकप्रतिनिधींनी या विषयात तत्काळ लक्ष घालून आठ दिवसांच्या आत तलाठ्याची नियुक्ती करावी; अन्यथा आंदोलन छेड़ण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.