जिल्हा परिषदेत विकासकामांचा खोळंबा

जिल्हा परिषदेत विकासकामांचा खोळंबा
Published on

जिल्हा परिषदेतील विकासकामांना खीळ
निधी असूनही तयार नाहीत आराखडे; प्रशासनाच्या संथ कारभारावर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आणि नवीन लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र, प्रशासनाच्या संथ आणि कासवगती कारभारामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही विकासकामांचे आराखडे तयार करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने विकासकामाला खीळ बसल्याचे चित्र आहे.
गेल्या चार वर्षांत १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषदेला सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम आणि समाजकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये विकासकामे होणे अपेक्षित आहे; मात्र, प्रशासकीय यंत्रणा अजूनही २०२२-२३ या वर्षाचेच आराखडे तयार करण्यात व्यस्त आहे. प्रत्यक्षात २०२३ ते २०२६ या पुढील तीन वर्षांचे नियोजन अद्याप कागदावरच आहे. जिल्ह्यामध्ये शिवसेनेने बहुमताने सत्ता मिळवली असून, ५६ पैकी ४१ सदस्य शिवसेनेचे आहेत. नवीन सदस्यांना आपल्या मतदार संघात विकासकामे करण्याची ओढ लागली आहे; मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होत आहेत. लोकसंख्येच्या आणि भौगोलिक निकषांनुसार निधीचे वाटप होणे गरजेचे असताना, प्रशासकीय अधिकारी अजूनही जुन्याच मानसिकतेत असल्याचे जाणवते. समाजकल्याण विभागाकडेही मोठा निधी उपलब्ध आहे; परंतु तेथेही आराखडे तयार करण्यास विलंब होत आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. शिक्षकांच्या पदोन्नतीचे आणि रिक्त जागांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले असून, कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. जर ४२ कोटींचा निधी पडून राहिला तर सदस्यांच्या वाट्याला येणारा प्रत्येकी ४० ते ५० लाखांचा विकासनिधी खर्च कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----
दृष्टिक्षेपात
* ४२ कोटींचा निधी ‘कागदावरच’
* १५व्या वित्त आयोगातून ४२ कोटींचा निधी उपलब्ध
* २०२२-२३च्या आराखड्यातच प्रशासन अडकले
* २०२३ ते २०२६ नियोजन अद्याप पूर्ण नाही
* पाणी, आरोग्य, बांधकाम, समाजकल्याण कामांना खीळ
* प्रशासकीय दिरंगाईमुळे विकास ठप्प
* लोकप्रतिनिधी सक्रिय, प्रशासन संथ
* विकासासाठी गतीची गरज
* ५६ पैकी ४१ सदस्य सत्ताधारी पक्षाचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com