मोहन उपाध्ये

मोहन उपाध्ये
Published on

- ratvardha33.jpg-
26O42447
टॅगिंग केलेले कासव.
- ratvardha34.jpg-
26O42448
अंडी घालण्यासाठी आलेले ऑलिव्ह रिडले कासव.
- ratvardha35.jpg-
P26O42449
कासवाची पिल्ले समुद्रातील पाण्यावर स्वार होण्यासाठी जाताना.


कासव संवर्धन म्हणजे पर्यावरण संवर्धन

लीड

समुद्री कासव हे निसर्गातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. समुद्राच्या तळाशी किंवा खाडीच्या तळाशी असलेले गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाऊन माशांना प्रजननासाठी जागा तयार करून देते. समुद्रात मेलेले जलचर जीव किंवा मासे खाऊन पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम समुद्री कासवे करतात. स्वच्छता कामगार म्हणून निसर्गाने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे आणि आजवर अव्याहतपणे ते ती जबाबदारी पूर्ण करत आहेत.
- मोहन उपाध्ये, कासव अभ्यासक.

जेलिफिशला खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम समुद्री कासवे करत असतात. समुद्री कासवांच्या जगभरात एकूण सात प्रजाती आढळतात. पैकी पाच भारतीय उपखंडांमध्ये आढळतात. त्यांच्यातली सगळ्यात छोटी प्रजात महाराष्ट्र किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अंदमान-निकोबार तसेच लक्षद्वीप या भागांमध्ये बाकीच्या दोन प्रजाती अंडी घालण्यास येतात. ही समुद्री कासवे १९७२ च्या वन्यजीव कायद्यानुसार अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणली जातात. नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा अंडी घालण्याचा काळ असतो. यावेळेला समुद्रकिनाऱ्यावरती रात्री किंवा पहाटे कोरड्या वाळूमध्ये स्वच्छ जागा बघून तिथे एक ते दीड फुटाचा खड्डा करून त्यामध्ये कुठलाही कचरा किंवा मारवेलीची मुळे नाहीत ना याची खात्री करून घेतात आणि त्यानंतर त्या खड्ड्यात एका वेळेला ८० ते १५० पर्यंत अंडी घालून पुन्हा वाळूने तो खड्डा भरून ही समुद्री कासवे पाण्यामध्ये परत निघून जातात.
या कासवांमध्ये माणसाप्रमाणे पालकत्व नाही. त्या अंड्यांचे काय होते, हे बघायला मादी कासव परत येत नाही. पिल्लंसुद्धा जन्मल्यानंतर आपल्या भावंडांना कधीच भेटत नाहीत. सोलो ट्रॅव्हल करणारी ही कासवे जिथे जन्म घेतात त्या किंवा जवळपासच्या किनाऱ्यावर त्यातली मादी अंडी घालण्यासाठी परत १५/२० वर्षांनी येते. गेल्या अनेक दशकांमध्ये समुद्री कासवांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसली. यामध्ये किनारपट्टीवरचे स्थानिक लोक ही अंडी चोरून खायचे. काही गावांमध्ये मादी कासवालाही मारून तिचे मटण खाल्ले जायचे. अंडी खाण्याबरोबरच ती विकायची किंवा बैलांना घालायची, असेही उद्योग त्या काळामध्ये काही गैरसमजुतीमुळे सुरू होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारी मच्छीमारी, पाण्यातील प्रदूषण ही कारणेसुद्धा यांच्या मरणाला कारणीभूत ठरली. किनारपट्टीवर वाढणारे पर्यटन, ज्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास किंवा अंडी घालण्याच्या जागा नष्ट व्हायला लागल्या किंवा त्यांना अंडी घालण्यासाठी अडथळे निर्माण होऊ लागले.

कासव संरक्षण संवर्धन मोहीम
चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने २००२ ला वेळास येथे समुद्री कासव संरक्षण संवर्धन मोहीम सुरू केली. हळूहळू ही मोहीम आसपासच्या बऱ्याच गावांमध्ये त्यांनी सुरू केली. ज्यामध्ये मिळालेली अंडी संरक्षित जाळीमध्ये सुरक्षित ठेवून त्यातून जन्माला आलेल्या पिल्लांना सुरक्षितपणे पाण्यात सोडले जाऊ लागले. या सर्व कामांमध्ये महाराष्ट्र वन विभाग यांचा मोठा पाठिंबा आणि सहभाग होता. त्यांच्याशिवाय हे काम होणे शक्यच नव्हते. हळूहळू ही मोहीम सुरू झाली असता त्यानंतर २००६ ला वेळास येथे पहिला एक दिवसाचा कासव महोत्सव सुरू करण्यात आला. कासव महोत्सव म्हणजे नक्की काय, तर समुद्री कासवाची पिल्ले वाळूतून पाण्यात जाण्याचा अनुभव घेणे त्याचबरोबर या समुद्री कासवांचा जीवनक्रम, त्यांना असलेले नैसर्गिक आणि कृत्रिम धोके याबद्दलची माहिती आणि किनाऱ्यावरती होणारी इतर कामे समजून घेणे. समुद्री कासव संरक्षण संवर्धनासारख्या मोहिमा का राबविल्या जातात, याबाबतची माहिती घेणे, माहितीपट पाहणे म्हणजे खरं तर, हा कासव महोत्सव आहे. त्यांचा जन्मसोहळा अनुभवण्याबरोबरच आपण आपल्या परीने कसे या प्रकल्पात सहभागी होऊ शकतो किंवा योगदान देऊ शकतो, याबाबत जाणून घेणे. आपल्या शंकांचे निरसन करून घेणे म्हणजे कासव महोत्सव.

कासवांना मेटल टॅगिंग
कांदळवन कक्ष दक्षिण कोकण, वन विभाग यांच्यामार्फत प्रत्येक किनाऱ्यावर काम करण्यासाठी स्थानिक माणसाची नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करणे, त्यांना योग्य ते प्रशिक्षण वेळोवेळी देणे, शाळा, महाविद्यालय यामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम करणे, समुद्रकिनारा स्वच्छता अभियान राबविणे, संशोधनात्मक कामे करणे किंवा त्यांना परवानगी देणे, असे अनेक कार्यक्रम या काळादरम्यान सुरू असतात. मच्छीमार बांधवांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम करणे त्याचप्रमाणे नुकसानभरपाई योजनांसारख्या योजना सुरू करून त्यांना नुकसानभरपाई देणे. नुकसानभरपाई योजना सुरू झाल्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे होणारे नुकसान भरून मिळण्यासाठी मदत होतेच; पण अनेक जलचर जीव, पाचही जातींची कासवे महाराष्ट्राच्या समुद्रात, खाडीत, जाळ्यात सापडल्याच्या नोंदी केल्या गेल्या आहेत. सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून समुद्री कासवांच्या प्रवासाचा अभ्यास करणे त्याचबरोबर समुद्री कासवांच्या मादीला पुढच्या दोन पंखांना धातूची पट्टी म्हणजेच मेटल टॅगिंग लावून त्यांचाही अभ्यास करणे, अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम वन विभाग, कांदळवन कक्षामार्फत राबविले जात आहेत.

साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास
सॅटेलाईट ट्रान्समीटर बसविलेल्या सात मादी कासवांपैकी एका मादी कासवाने भारतामध्ये एक इतिहास रचला आणि तो म्हणजे पाच महिन्यांच्या काळात साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून पूर्व किनारपट्टीजवळ ती पोहोचली. आठवी मादी कासव डहाणू येथे टॅग करून १९ नोव्हेंबर २०२५ ला सोडली ती थेट ओमानच्या जवळपास पोहून परत महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्याजवळ सध्या पोहत आहे. टॅगिंगमुळे नवनवीन माहिती उलगडत आहे. सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेल्या माद्यांची नावे ठेवण्यात आली होती.
पहिलीचे नाव प्रथमा, दुसरी सावनी, तिसरी वनश्री, चौथी लक्ष्मी, पाचवी रेवा, सहावी गुहा, सातवी बागेश्री. ज्या मादीला आंजर्ल्यामध्ये ट्रान्समीटर बसविला तिने ३०व्या दिवशी केळशीमध्ये येऊन अंडी घातली. ३० जानेवारी २०२४ पासून त्या अंडी घालायच्या काळात एकूण ६२ माद्यांच्या पंखांना मेटल टॅग लावण्यात आले. यामध्ये ५९ गुहागर, एक वेळास आणि दोन आंजर्ले येथे बसविण्यात आले. हे टॅग लावण्यापूर्वी गुहागर येथे २५ जानेवारीला एक टॅग लावलेली कासव अंडी घालताना किनाऱ्यावर काम करणाऱ्या बीच मॅनेजरना आढळली. २०२१ला झेडएसआय संस्थेने ज्या मादी कासवाला टॅग लावला होता तिने २०२४ ला गुहागर येथे अंडी घातली. भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची नोंद करण्यात आली आणि तिथून समुद्री कासवे ज्या भागात जन्म घेतात तिथेच जवळपासच्या किनाऱ्यावर नाही, तर अशा वेगळ्या किनाऱ्यांवर अंडी घालू शकतात, असेही निदर्शनास आले.
-----------
चौकट १
सजगता दाखवायला हवी
काळ झपाट्याने बदलतो आहे. त्यानुसार वातावरणात होणारे बदल आपण सगळे अनुभवतोय. निसर्गाची वाताहत होते आहे, ती मानवी हस्तक्षेपामुळे. आजही वेळ गेलेली नाही. आपण कळत-नकळत होणाऱ्या चुका थांबवू शकतो, ते आपल्या हातात आहे. समुद्री कासव संवर्धन असेल किंवा अनेक सजीवांवर त्यांना वाचविण्यासाठी किंवा त्यांचे नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी वन विभाग कामे करीत आहेच. त्यांच्या जोडीला अनेक एनजीओ आहेत; पण गरज आहे ती आपण सजगता दाखविण्याची.
--
त्यांना हवा सुरक्षित किनारा
समुद्री कासव आपल्याकडून फार काही अपेक्षा करीत नाहीत. त्यांना त्यांचे किनारे सुरक्षित हवे आहेत. गर्दी, गडबड, गोंधळ, लाईट या सगळ्या गोष्टी त्यांना त्रासदायक ठरतात. किनाऱ्यावर गाड्या फिरल्या तर वाळू घट्ट होते. ज्यामुळे त्यांना वाळूत अंडी घालायला खड्डा करता येत नाही. किनाऱ्याचा नैसर्गिक उतार हरवतो, ज्याचा वापर मादी कासव अंडी घालून परत जाताना सहज सरपटायला करते; पण आज आपले किनारे समृद्ध करणे आपल्या आणि फक्त आपल्याच हातात आहे. वेळ निघून गेली तर डायनासोरप्रमाणे पुढच्या पिढीला कासवे फोटोत आणि चित्रपटातच बघायला राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com