खारेपाटण परिसराला चक्रीवादळाचा तडाखा

खारेपाटण परिसराला चक्रीवादळाचा तडाखा
Published on

(काही फोटो टॉपला घ्या, काही मजकुरात घ्या)

42581
खारेपाटण ः येथील कालभैरव मंदिराजवळील जुना वटवृक्ष वादळात कोसळून पडला.

42582
खारेपाटण ः वादळामुळे येथील मुख्य रस्त्यावरील विजेचे खांब वाकले असून, ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

42583
खारेपाटण ः येथील काझीवाडी येथील मुश्ताक पावसकर यांच्या घराचे लोखंडी पत्र्याचे छप्पर वादळात उडून नुकसान झाले.

42584
खारेपाटण ः शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली.

42585
खारेपाटण ः येथील रस्त्यालगत विजेचे खांब आणि तारा तुटून पडल्‍या आहेत.

42586
खारेपाटण ः खारेपाटण-पोंभुर्ले रस्त्यावर वायंगणी बाणेवाडी येथे मोठे आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीला बंद झाला होता. (सर्व छायाचित्रे ः रमेश जामसंडेकर)


खारेपाटण परिसराला चक्रीवादळाचा तडाखा

अनेक घरांची पडझड; विद्युत खांब मोडून वीज वाहिन्या रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १० ः खारेपाटण शहर आणि परिसराला शनिवारी सायंकाळी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. पत्रे उडून गेल्‍याने तसेच झाडांच्या फांद्या कोसळल्‍याने अनेक घरांची पडझड झाली. तर ठिकठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्‍याने खारेपाटणचा वीजपुरवठा ठप्प झाला.
खारेपाटण परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजल्‍यापासून जोरदार वादळी वारे वाहू लागले. दुपारी चारनंतर वाऱ्याचा वेग वाढला. तसेच अवकाळी पावसालाही सुरुवात झाली. सोसाट्याच्या वारा, चक्रीवादळाने खारेपाटण शहर आणि परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरांची कौले आणि सिमेंटचे पत्रे वाऱ्याने उडून गेले. तर अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले. त्‍यामुळे दुपारी साडेतीन वाजल्‍यापासूनच खारेपाटणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब आणि तारा तुटल्‍याने खारेपाटण आणि परिसरातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली. आज सकाळपासून महावितरणने परिसरातील वीज दुरुस्तीची कामे सुरू केली होती. यात ठिकठिकाणी नवीन वीज खांब बसविणे, वीज तारा जोडणे आदी कामे सुरू होती.
गेल्‍या काही वर्षांत सर्वांत मोठे चक्रीवादळ आल्‍याची माहिती येथील नागरिकांकडून देण्यात आली. दरम्‍यान, खारेपाटण बाजारपेठ मुख्य रस्त्यावर हायस्कूलनजीक आंब्याचे मोठे झाड कोसळल्‍याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. खारेपाटण ते पोंभुर्ले रस्त्यावर वायंगणी बाणेवाडी येथे मोठे आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीला बंद झाला होता. त्‍यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. आंब्याचे झाड हटविण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्‍याने एस. टी. बसमधील प्रवाशांनी पायी घर गाठले. विजयदुर्ग-कोल्हापूर रस्त्यावर फणसगाव कॅन्टीन या राज्य मार्गावर दोन ठिकाणी मोठी झाडे पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
---------
आंबा, काजू, केळी बागेला फटका
खारेपाटण पंचशीलनगर येथे वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांची कौले आणि पत्रे उडून गेले. तसेच रामेश्वरनगर, कपिलेश्वरवाडी, कालभैरववाडी, शिवाजी पेठ, बंदरगाव, काजिर्डे, संभाजीनगर, कर्लेवाडी, जैनवाडी, कोष्टेवाडी, गुरववाडी, हसोळ टेंब कोंडवाडी आदी भागांतील नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात आंबा आणि काजू कलमे, केळी, फणस आदी झाडे देखील तुटून पडली आहेत.
------------
घरांचे मोठे नुकसान
खारेपाटण काझीवाडी येथील मुश्ताक पावसकर यांच्या घराचे लोखंडी पत्राचे छप्पर वादळात उडून याच वाडीतील नजीर काझी यांच्या घरावर पडल्यामुळे या दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीवरील पत्रे वादळात उडून गेले आहेत. या इमारतीवरील हवेने उडालेला एक पत्रा खारेपाटणमधील एका युवकाच्या डोक्यात पडल्यामुळे तो जखमी झाला आहे. खारेपाटणमध्ये झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटणचे उपसरपंच महेंद्र गुरव यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना धीर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com