

42813
तुटक्या फांद्या दोन दिवसांत हटवा
निशांत तोरसकर ः अन्यथा नगरपरिषदेच्या दारात टाकू
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सबनीसवाडा राजवाडा नजीकच्या रस्त्यावर पंधरा दिवसांपासून झाडाच्या फांद्या अर्धवट तुटलेल्या अवस्थेत लोंबत आहेत. वारंवार सूचना देऊनही नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून, यामुळे नागरिक व वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना शहर संघटक निशांत तोरसकर यांनी आक्रमक भूमिका घेत, प्रशासनाने दोन दिवसांत या फांद्या न हटवल्यास त्या तोडून नगरपरिषदेच्या दारात आणून टाकण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका मोहिनी मडगावकर तसेच भाजपचे युवा कार्यकर्ते ॲड. चैतन्य सावंत यांनी निवेदन देऊनही प्रशासन कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. खुद्द सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने, सावंतवाडी नगरपरिषदेवर सत्ताधाऱ्यांचा कोणताही अंकुश उरला नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी या फांद्या लोंबत आहेत, तिथून अवघ्या १०० मीटर अंतरावर नगराध्यक्षांचे निवासस्थान आहे. तरीही नगराध्यक्षांकडून या गंभीर प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
मागील वर्षी याच परिसरात झाड अंगावर पडून एका युवा भजनी बुवाचे निधन झाले होते. इतकी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन अजूनही ढिम्म असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. श्री. तोरसकर यांनी या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नीतेश म्हाडगुत व आरपीआयचे पदाधिकारी प्रदीप कांबळे उपस्थित होते. आता या इशाऱ्यानंतर तरी प्रशासन तातडीने कार्यवाही करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.