

फोटो :kan111.jpg
42903
कळसूली : माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमात बोलताना माजी आमदार वैभव नाईक.
ग्रामीण शिक्षण वाचवण्यासाठी समाजाने पुढे यावे
वैभव नाईक : कळसुली हायस्कूल माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ : आज ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली असून अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिक्षण संस्था टिकविण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थी व परिवार स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले, तर सरस्वती पूजन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघ मुंबईचे अध्यक्ष भालचंद्र दळवी, कळसुली शिक्षण संघाचे अध्यक्ष सूर्यकांत दळवी, कार्याध्यक्ष विजय सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आर. बी. दळवी, स्कूल कमिटीचे चेअरमन के. आर. दळवी, मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, कृषी शास्त्रज्ञ विजय सावंत, माजी मुख्याध्यापक एस. एस. दळवी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, “१९६६ साली स्थापन झालेल्या या शिक्षण संस्थेने गेल्या अनेक दशकांत हजारो गुणवंत विद्यार्थी घडवून समाजाला दिशा दिली आहे. त्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाची साधने उपलब्ध नसतानाही गावातील सामान्य शेतकरी कुटुंबांनी दूरदृष्टी ठेवून शाळा उभारली. ही त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी होती.”
ग्रामीण शिक्षणाबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, कमी पटसंख्येमुळे अनेक वर्ग बंद केले जात आहेत. गेल्या चार वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५० हून अधिक प्राथमिक शाळा बंद झाल्या असून स्थलांतर आणि लोकसंख्या घट याचा मोठा परिणाम ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर होत आहे. रोजगार आणि व्यवसायासाठी लोक शहरांकडे वळत असल्याने गावांतील शाळांना फटका बसत आहे.
नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, कळसुली शिक्षण संघ आज एक ब्रँड बनला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम संस्थेने गेली ६७ वर्षे सातत्याने केले आहे, या संस्थेतून घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
यावेळी ७५ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशांत दळवी यांनी केले. सूत्रसंचालन आनंद सावंत यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.