

मालवण गवंडीवाड्यात नमो उद्यान
जागेवर शिक्कामोर्तब : आधी दुर्गंधी दूर करणार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : शहरात नमो उद्यानासाठी गवंडीवाडा येथील पालिकेची जागा निश्चित करण्यात आली. पालिकेच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या येथील नगरपालिकेच्या या विशेष सभा झाली. यावेळी शहरात शासन आदेशानुसार नमो उद्यान साकारण्यासाठी जागा निश्चितीचा ठराव मांडण्यात आला. राज्यातील नगरपरिषदांना ‘वैशिष्ट्यपूर्ण’ कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायती उत्कृष्ट उद्यान विकसित करण्याकरिता १ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याकरिता तातडीने जागा निश्चित करून काम सुरु करण्याचे शासनाचे सक्त आदेश आहेत. या नमो उद्यानासाठी शहरातील सात आरक्षित जागा सूचित करण्यात आल्या. मात्र सदर जागांच्या भूसंपादनाला उपलब्ध निधीपेक्षा जास्त निधी लागणार असल्याने तसेच या प्रक्रियेस विलंब होणार असल्याने नगरपालिकेच्या मालकीची व ताब्यात असलेली गवंडीवाडा येथील जागा निश्चित करून तेथे उद्यानाचे काम तात्काळ सुरु करणे शक्य आहे असे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी सभागृहासमोर मांडले. यावर सभागृहात चर्चा झाली.
यावेळी मंदार ओरसकर यांनी गवंडीवाडा येथील संबंधित जागेच्या आजूबाजूला व्हाळी असून कचराही टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने व्हाळीतील सांडपाणी बंद करावे तसेच कचरा टाकण्यास बंदी करावी, असे सांगितले. या जागेबाबत सकारात्मक चर्चा होऊन नमो उद्यानासाठी गवंडीवाडा येथील जागेला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नगरसेवक महेश कांदळगावकर, सहदेव बापर्डेकर, रविकिरण तोरसकर, सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण, सुदेश आचरेकर, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका पूनम चव्हाण, शर्वरी पाटकर, अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, दर्शना कासवकर, अन्वेषा आचरेकर, महानंदा खानोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक तथा माजी नागराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी काही दिवसापूर्वी वाहतूक कोंडी व वीज समस्या याविषयी मालवण नगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीसाठी विरोधी गटातील नगरसेवकांना का बोलविले नाही? आढावा बैठकीसाठी आम्हाला विश्वासात का घेतले जात नाही, आढावा बैठकीत केलेल्या वाहतूक नियोजनाचे पुढे काय झाले? की फक्त दिशाभूल केली गेली असे सवाल नगराध्यक्ष ममता वराडकर यांना विचारत जोरदार टीका केली. आचरेकर यांच्या भूमिकेला महेंद्र म्हाडगुत यांनीही दुजोरा दिला. यावर सत्तधारी नगरसेविका पूनम चव्हाण यांनीही विरोधकांची बाजू घेत विरोधकांनाही आढावा बैठकीसाठी बोलावले गेले पाहिजे असे सांगत एक प्रकारे नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला.
चौकट
ऐन पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी
आढावा बैठक घेऊन तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन देखील ऐन पर्यटन हंगामात मालवणातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही, वाहतूक पोलिस कुठे तैनात झालेत? अशी विचारणाही पूनम चव्हाण यांनी करत प्रश्न सुटत नसेल तर पून्हा आढावा बैठक बोलवा, असे सांगितले.
चौकट
विशेष सभेत यावर चर्चा
नमो उद्यानासाठी जागा निश्चिती
आरक्षित सात जागांचा प्रस्ताव
गवंडीवाडा परिसरातील समस्या
सांडपाणी बंद करून कचरा टाकण्यास बंदीची मागणी
नमो उद्यानाचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना
वाहतूक कोंडी व वीज समस्येवरील बैठकीत विरोधकांना निमंत्रण नसल्याचा आरोप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.