

P26O43016
(एआय चित्र)
आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहा
विभागीय आयुक्त अग्रवाल ःमुंबईतील बैठकीत अर्ध्या तासात मदत पोहोचवण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः ‘आपत्तीकाळात सर्व यंत्रणांनी नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी अचूक नियोजन करावे. बचावसाहित्य आणि पथक अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी पोहोचेल, याची खातरजमा करावी,’ असे कडक निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.
पावसाळा पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि विविध यंत्रणांच्या दूरदृष्यप्रणाली बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि मुंबईचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, एनडीआरएफ, कोकण रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आयुक्त अग्रवाल यांनी मॉन्सूनपूर्वीची नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि झाडांची छाटणी ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत आणि शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, अतिधोकादायक आणि बेकायदेशीर इमारतींमधील रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर करण्याचे निर्देशही दिले आहेत. कोकण विभागीय स्तरासह सर्व जिल्हा आणि तालुकास्तरावर चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कक्षात इंटरनेट, हॉटलाईन आणि ई-मेल सेवा सज्ज ठेवा, ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याला संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेण्याच्या सूचना दिल्या. ‘आपदा मित्र’ अंतर्गत प्रशिक्षित सदस्यांच्या माध्यमातून बचावसाहित्याची चाचणी घेण्यासाठी ठिकठिकाणी मॉकड्रिल्स राबवण्याचे आदेश दिले आहेत.
कोकण विभागात नऊ मोठे, नऊ मध्यम आणि १४३ लघुप्रकल्प आहेत. अतिवृष्टीमुळे धरणे भरल्यास पाण्याचा विसर्ग नियोजित पद्धतीने करावा आणि स्थानिकांना विसर्गापूर्वी पूर्वसूचना द्यावी तसेच, पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करावे. साहसी खेळांवर बंदी आणून रिसॉर्ट आणि हॉटेल मालकांना सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.
-----
यंदा पावसाचा अंदाज
हवामान विभागाने यावर्षी नैऋत्य माॅन्सूनचे प्रमाण सामान्यापेक्षा थोडे कमी (सुमारे ९२ टक्के) राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तरीही प्रशासनाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी (पूर, दरड कोसळणे, चक्रीवादळ) पूर्णपणे सज्ज राहावे, असे आवाहन आयुक्तांनी यांनी केले.
----
- आपत्ती नियंत्रण कक्षाचे क्रमांक
* रत्नागिरी ०२३५२-२२२२३३ ०७०५७२२२२३३ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपत्तीसंबंधी तक्रारी या क्रमांकावर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.