सौंदाळे गाव विद्यार्थ्यांनी आणले डिजिटल नकाशावर

सौंदाळे गाव विद्यार्थ्यांनी आणले डिजिटल नकाशावर
Published on

swt1211.jpg
43025
सौंदाळे ः येथील ई मॅगेझिनचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थित झाले.


सौंदाळे गाव विद्यार्थ्यांनी आणले डिजिटल नकाशावर
ई -मॅगझिनचे प्रकाशन : समृध्द गावासाठी टाकलेले आश्‍वासक पाऊल
संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः तालुक्यातील सौंदाळे गावातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली श्री नवलादेवी माध्यमिक विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाव डिझिटल नकाशावर आणला आहे. गावासह परिसराची भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक ओळख होण्याच्या अनुषंगाने नियतकालिकेच्या (ई -मॅगझिन) माध्यमातून माहिती संकलित केली आहे. भविष्यात गावातील तरूण, महिलांना रोजगाराच्या नव्या संधी गावातच कशा उपलब्ध होऊ शकतील यासाठी प्रयत्न राहणार आहेत. यातून गाव समृध्द होण्यासाठी टाकलेले आश्‍वासक पाऊल असल्याचे मानले जात आहे.
सध्याचा डिजिटल माध्यमाचा जमाना आहे. तंत्रज्ञानाला बऱ्या-वाईट अशा दोन्ही बाजूची किनार असते. मात्र यातून चांगले काय घेता येईल याचा प्रामाणिक विचार समोर आल्यास अनेक बाबतीत क्रांती घडण्यास मदत होऊ शकेल. यातूनच गावातील काही मंडळींनी ही संकल्पना पुढे आणली. सौंदाळे येथील श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने एक नियतकालिक (ई -मॅगझिन) प्रकाशित करण्याचे ठरवले. याचे संपादन आणि संपादकीय मंडळ श्री नवलादेवी माध्यमिक विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांमधूनच शिक्षकांच्या सल्ल्याने निवडण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांचेच संपादकीय मंडळ स्थापन करण्यात आले. यात संपादक -श्रेया कणेरे, उपसंपादक -आर्या मोंडे, सदस्य -निधी मिठबांवकर, जय गुरव, रिया राणे, प्रतिमा मिठबांवकर, दुर्वांक मोंडे, अविष्कार कामतेकर, निखील गुरव, अनुष्का गुरव, शमिका वैशंमपायन, सिध्दी गुरव, प्रथम मिठबांवकर यांचा समावेश असून सल्लागार म्हणून गुरूनाथ राणे तर मुख्याध्यापक गणेश रानडे, शिक्षक वैजनाथ कदम मार्गदर्शक आहेत.

कोट
सौंदाळे गाव डिझिटलच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी गावातीलच विद्यार्थ्यांनी याची मांडणी केली आहे. स्थानिक भौगोलिक रचना, आसपासची पर्यटनात्मक सौंदर्यस्थळे, गावाची ओळख आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तंत्रज्ञानातून सामाजिक उन्नती साधण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. गावातच रोजगाराच्या संधी कशा उपलब्धता करता येतील यासाठी सामुहिक प्रयत्न राहणार आहे.
- गुरूनाथ राणे, सल्लागार, ई -मॅगेझिन.

चौकट
हे असणार ई मासिकात अन् हा आहे उद्देश -
सामाजिक, शैक्षणिक, कला, व्यवसाय, शेती, मासेमारी, पर्यटन, ऊर्जा, पर्यावरण आणि शास्वत विकास अशा विविध विषयावर विद्यार्थीच लेख लिहिणार.
इथल्या मुलांनी येथेच राहून स्वतःचे भविष्य घडवावे अन् गावाचा विकास करावा यासाठी मुलांना प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्देश.
गावाची जैवविविधता, वाघोटण खाडीतील विविध मासळी प्रकार, कांदळवन आणि त्यातील पक्षी निरीक्षण, वन्यजीव या निसर्ग संपदामधून भविष्यात अनेक व्यवसाय स्थानिक पातळीवरच उभे करण्याचा मानस.
हे मासिक पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठीच असून विद्यार्थ्यांमार्फतच प्रकाशन.
भविष्यात डिजीटल प्रणाली अधिक सक्षम करून विविध शहरामध्ये विखुरलेले स्थानिक गावकरी एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा यातून प्रयत्न.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com