भाजीविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

भाजीविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
Published on

swt1216.jpg
43053
सावंतवाडी : शहरातील मच्छी मार्केटजवळील भाजी विक्रेत्यांवरील कारवाईप्रसंगी शिवसेना नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर व इतर.

भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
सावंतवाडी पालिकेची मोहीम; नगरसेवक देव्या सूर्याजी आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ : शहरातील मच्छी मार्केट शेजारी नाल्याच्या स्लॅबवर भाजी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांवर नगरपालिकेकडून आज कारवाईचा बडगा हाती घेतल्यानंतर स्थानिक शिवसेना नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्यासह शर्वरी धारगळकर व सायली दुभाषी आक्रमक झाल्या. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी आहेत. त्यांच्यावर आधी कारवाई करा आणि नंतरच गेली ३० वर्षे नगरपालिकेची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा, अशी मागणी लावून धरत त्यांनी स्थानिक विक्रेत्यांची पाठराखण केली. तर तेथील नगरसेवक सूर्याजी यांच्या मागणीनुसारच ही कारवाई केल्याचे नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी सांगत सध्या तरी कारवाई थांबविली असून, या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले.
येथील नगरपालिकेच्या मच्छी मार्केटशेजारी असलेल्या भाजी विक्रेत्यांवर दुपारी नगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले होते. हा प्रकार नगरसेवक सूर्याजी, धारगळकर आणि दुभाषी यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही कारवाई कोणाच्या सांगण्यानुसार करीत असल्याचे विचारले. यावेळी आम्हाला नगराध्यक्षांनी अशा प्रकारच्या सूचना केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. सूर्याजी हे आक्रमक झाले. ते म्हणाले, नगरपालिकेच्या मच्छी मार्केटच्या पार्किंगच्या जागेत परप्रांतीय भाजी विक्रेता व्यवसाय करतो. त्यामुळे पार्किंगला अडथळा होतो. माझी मागणी अशी होती की, सदर भाजी विक्रेत्याला मच्छी मार्केट नजीक असल्याने त्यांना व्यवसायासाठी बाजूला जागा द्यावी. ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागेत व्यवसाय करणाऱ्यांना तेथून हटवावे, अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली होती; परंतु गेली ३० वर्षे त्या ठिकाणी पालिकेचा कर भरून व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर केवळ आकसापोटी कारवाईचा बडगा नगराध्यक्षांकडून उगारण्यात आला, हे चुकीचे आहे. माझा कोणाच्या व्यवसायाला विरोध नाही. केवळ ज्या जागेवर व्यवसाय करतो, ती जागा चुकीची असल्याचे माझे म्हणणे होते.

कोट
कोणा एकावर कारवाई करणे हे चुकीचे आहे. सदर परिसरात मच्छी मार्केट असून, त्याठिकाणी मच्छी विक्री केली जाते. अशा ठिकाणी भाजी व्यवसाय करणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्याठिकाणी भाजी विक्रेत्या करणाऱ्या सर्वांवरच हा कारवाईचा बडगा उगारला होता. सूर्याजी यांच्या म्हणण्यानुसार शहरात अन्य ठिकाणी अनधिकृत व्यवसाय होत असतील तर त्याचा विचारही केला जाईल. प्रशासन कसे चालवावे, हे आम्ही ठरवू. सद्यःस्थितीत तरी संबंधित भाजी विक्रेत्यांवर हाेणारी कारवाई थांबविली आहे. यावर योग्य तो निर्णय घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल.
- श्रद्धा सावंत-भोसले, नगराध्यक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com