

-rat१२p१.jpg -
P26O42976
अमित शिगवण
------
तुळशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
कुटुंबाचा आधार हरपला; अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ ः मे महिन्याच्या सुटीसाठी गावी आलेल्या तरुणाचा तुळशी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. अमित बाळकृष्ण शिगवण (वय ३२, मूळ गाव तुळशी गणेशवाडी) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे तुळशी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. धरण परिसरातील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शिगवण हे मे महिन्याच्या सुटीसाठी आपल्या गावी आले होते. रविवारी (१० मे) सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबीयांसमवेत तुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी किनाऱ्यालगत पाण्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक नितीन गवारे, बीट अंमलदार दत्ताराम बाणे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र, धरणाच्या कालव्याचा दरवाजा आणि खोल पाण्यामुळे संध्याकाळच्या वेळेस शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते. सोमवारी (११ मे) सकाळी महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. प्रशांत साळुंखे आणि त्यांच्या पथकाने शोध मोहीम राबवीत अमित शिगवण यांचा मृतदेह चिखलात अडकलेला शोधून काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला.
-----
बचाव यंत्रणेचा अभाव
तालुक्यातील तिडे, भोळवली, चिंचाळी, पंदेरी आणि तुळशी येथील धरण परिसरात पुरेशा सुरक्षा उपाययोजना नसल्याच्या गंभीर बाबी यानिमित्ताने पुढे येत आहेत. धरण परिसरात सुरक्षा रक्षक, इशारा फलक किंवा बचाव यंत्रणा नसल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई वाढल्याने अनेक ग्रामस्थ आंघोळीसाठी किंवा पाणी भरण्यासाठी धरण परिसरात जातात. धरणातील गाळ, चिखल आणि पाण्याची खोली यांची पुरेशी माहिती नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.