मनरेगातील ९ हजार कामे अपूर्ण, मजुरी रखडली

मनरेगातील ९ हजार कामे अपूर्ण, मजुरी रखडली
Published on

26O43189
(एआय चित्र)

‘मनरेगा’ची नऊ हजार कामे रखडली
तीन महिने मजुरी थकीत ; फळबाग लागवडीही मंदावली, विकासकामाच्या गतीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) काम करणाऱ्या जिल्ह्यातील मजुरांचे गेल्या तीन महिन्यांची मजुरी अद्याप मिळालेले नाही. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीतील मजुरी थकीत असल्याने मजुरांमध्ये असंतोष असून, याचा थेट परिणाम विकासकामांच्या गतीवर झाला आहे. मजुरी वेळेत न मिळाल्याने अनेक मजुरांनी कामावर येणे बंद केल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ९ हजार १३३ कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.
ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या या योजनेत केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाला असला, तरी राज्य शासनाकडून येणारा ४० टक्के निधी अद्याप मिळालेला नाही. यामुळे मजुरांचे पैसे रखडले आहेत. जिल्ह्यात जलसंधारण, शेततळी, फळबाग लागवड आणि रस्ते यांसारखी महत्त्वाची कामे सुरू आहेत, मात्र मजुरांअभावी ती रेंगाळली आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण ८ हजार ९८ कामे पूर्ण झाली. यात जलसंधारणाची ३,२१०, रस्त्यांची १,४२०, वैयक्तिक लाभाची ८९० आणि इतर ३७२ कामांचा समावेश आहे. २०२२ पासून आतापर्यंत ९ हजार १३३ कामे प्रलंबित आहेत. यामध्ये फळबाग लागवड आणि मुदतवाढ दिलेल्या विकासकामांचा मोठा वाटा आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ३५१ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कामे संगमेश्वर ८७, दापोली ७७ आणि चिपळूण ५४ तालुक्यात आहेत. मनरेगामार्फत शेततळी, सिंचन विहिरी, आंबा-काजू-नारळ लागवड, गोठे आणि भातखाचर बांधबंदिस्ती यांसह २६६ हून अधिक प्रकारची कामे केली जातात. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार शेततळी पूर्ण झाली असली, तरी उर्वरित कामांसाठी मजूर मिळणे आता कठीण झाले आहे.
----
फेसअप प्रणालीला विरोध
१ एप्रिलपासून मनरेगा मजुरांच्या उपस्थितीसाठी ‘फेसअप’ प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. दिवसातून दोनवेळा ऑनलाइन फोटो अपलोड करण्याच्या जाचक अटीमुळे मजूर त्रस्त आहेत. त्यातच ग्रामरोजगार सेवक संपावर गेल्याने फोटो अपलोड करण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. तंत्रज्ञानातील अडथळे आणि मजुरीतील विलंब यामुळे मजुरांची उपस्थिती दिवसेंदिवस घटत आहे.
----
२०२५-२६ मधील पूर्ण झालेली कामे
तालुका* पूर्ण झालेली कामे
मंडणगड* ४७२
दापोली* ८१०
खेड* ८८०
गुहागर* ६८०
चिपळूण* १५४०
संगमेश्वर* १२१०
रत्नागिरी* ११८०
राजापूर* १०५०
लांजा* ९२०
---
शासनाने प्रश्न सोडवावा
मजुरीचा प्रश्न वेळेत सुटावा यासाठी शासनाने नियमात सुधारणा करणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात फळलागवड होते. त्या कामांना ब्रेक लागू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे, अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे.
---

Marathi News Esakal
www.esakal.com